हिंदुत्व हा सर्वसमावेशक विचार : भैय्याजी जोशी

पुसदमधील केशव स्मृती भवनाचे लोकार्पण

पुसद, २२ जानेवारी : संघाने समाजाला एक चेहरा दिला आहे. हिंदू म्हणजे कोण हे संघाने जगाला सांगण्याचे कार्य केले आहे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भूमिका मनात बाळगून संघाचे कार्य अखंड, अविरत सुरू आहे. बदलत्या भारतात मूक साक्षी होण्यापेक्षा, सक्रिय साक्षी होणे आणि भारताला सुपर पॉवर बनवण्यापेक्षा सुपर राष्ट्र बनवणे, हे आपले लक्ष्य असले पाहिजे. हिंदुत्वाचा विचार कोणाला पराजित करण्याचा नाही तर सर्वांना जिंकण्याचा आहे. शस्त्र नव्हे तर शास्त्र घेऊन आमचा प्रवास सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. पुसद येथील सांस्कृतिक संवर्धक मंडळ यवतमाळच्या ‘केशव स्मृती’ या भवनाचे लोकार्पण करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

पुसद संघ कार्यालय परिसरात हा कार्यक्रम मंगळवार, २१ जानेवारीला पार पडला. याप्रसंगी मंचावर आचार्य जितेंद्रनाथ महाराज, संघाच्या विर्दर्भ प्रांताचे प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, पुसदचे विभाग संघचालक विजयराव कोषटवार आणि पुसद जिल्हा संघचालक डॉ. पंकज जयस्वाल उपस्थित होते.

केशव स्मृती भवनाचे कार्यालय हे विचार विमर्श करण्याचे केंद्र असून, ते सर्वांसाठी सदैव खुले आहे. विदर्भाच्या भूमीने अनेक संत, प्रचारक आणि विचारक दिले आहेत. त्यामुळे केशव स्मृती हे ऊर्जा देणारे, समर्पित जीवनाचा आदर्श जपणारे नाव आहे. आपले चिंतन श्रेष्ठ आहे, अनेकांनी इतका काळ त्याचे संरक्षण केले. आज आपण त्या चिंतनाचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असा सल्लाही भैय्याजी जोशी यांनी दिला.

संघाचे संस्थापक प. पू डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा प्रवास ज्या मोजक्याच गावांना झाला, त्यामध्ये पुसदचा समावेश आहे. संघासाठी आज अनुकूल काळ असतानासुद्धा समाज सहभागाचा आपला मूळ भाव कायम ठेवून पुसदवासीयांनी समाज सहभागाने भवन निर्माण केले, ही कौतुकाची बाब आहे. शताब्दीनिमित्त आणि कुंभमेळ्याच्या काळात होणारे हे लोकार्पण सदैव स्मरणात राहील, असे जितेंद्रनाथ महाराजांनी नमूद केले. संघ, संत आणि समाज या त्रिकुटांना सोबत घेऊन देशाला पुन्हा परमवैभवाला नेणे हेच आपले ध्येय असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.

प्रास्ताविक व परिचय पुसद जिल्हा संघचालक डॉ. पंकज जयस्वाल यांनी केले. केशव स्मृती भवनाच्या निर्मिती कार्यात सहकार्य करणार्‍यांचे त्यांनी आभार मानले. संचलन नगर कार्यवाह अभिषेक गवळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *