‘व्यास का तहखाना’ येथे होणार नित्य पूजा
वाराणसी, ३१ जानेवारी : उत्तरप्रदेशच्या वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी दिली आहे. त्यानुसार ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तहखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे.वाराणसी कोर्टाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या ७ दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात हिंदू पक्षकारांचे वकील विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, हिंदू पक्षकाराला ‘व्यास का तहखाना’ येथे पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात ७ दिवसांत व्यवस्था करुन द्यावी लागेल. त्यामुळे आता सर्वांना पूजा करण्याचा अधिकार मिळेल.याबाबत कोर्टाने १७ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ‘व्यास का तखाना’ची किल्ली आपल्या ताब्यात घेतली होती. हिंदू पक्षाचे वकील आजची घटना राममंदिराचे दरवाजे खुले करण्याच्या घटनेसारखी मानत आहेत. या तळघरात १९९३ पूर्वी पूजा होत असे. अयोध्येतील बाबरी पाडल्यानंतर ज्ञानवापीच्या चारी बाजूंना प्रशासनाने लोखंडाचे बॅरिकेंडिग लावले होते. त्यामुळे या तळघरात जाणे शक्य नव्हते.
माहितीनुसार, सोमनाथ व्यास यांचे कुटुंबिय १९९३ पूर्वी या तळघरात नियमित पूजा करायचे. पूजा पुन्हा सुरु व्हावी यासाठी व्यास यांचे नातू शैलेंद्र व्यास यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी याचिकेमध्ये म्हटले होते की, १९९३ पासून तळघरात पूजा बंद झाली आहे. सध्या हे तळघर अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे. आता या तळघरात पुन्हा पूजा सुरु होईल.