केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन

अहिल्यानगर, दि. ५ ऑक्टोबर : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुपद्वारे निर्मित सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युएल प्रकल्पा’चे उदघाटन तसेच शेतकरी सहकार मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजचा दिवस हा सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. सहकार क्षेत्रातील कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आज कोपरगावात उभा राहिला असून, हा प्रकल्प विवेक कोल्हे यांच्या पुढाकारातून आणि सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहकारी परंपरेतून वास्तवात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा केवळ अन्नदाता नव्हे, तर ऊर्जादाताही व्हावा हा दूरदर्शी विचार मांडला. त्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी सहकार क्षेत्रात नव्या पिढीचे प्रकल्प उभे राहत आहेत. केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांसोबतच्या दीर्घकालीन करारामुळे कारखान्यांना स्थिर निधी मिळू लागला आहे.
वातावरणीय बदलांच्या आव्हानांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोळसा आणि तेलाच्या वापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जास्त्रोतांचे परिवर्तन गरजेचे आहे.

सेंद्रिय कचर्यापासून गॅस तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटॅश तयार होईल ज्यामुळे शेतकऱ्यांना जैविक खत देखील प्राप्त होईल. हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरित अर्थव्यवस्थेची दूरदृष्टी आहे. असे अनेक प्रकल्प राज्यात उभे राहतील आणि केंद्र सरकार नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉरर्पोरेशनच्या (NCDC) माध्यमातून त्यांना निधी देईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतही सांगितले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी पुन्हा खंबीरपणे उभा राहील, अशी भरीव मदत राज्य सरकार करेल.

