
मुंबई, दि. २० फेब्रुवारी : यावर्षी वातावरणातील बदलांमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून जिल्ह्यातील आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान आजपर्यंत कधीही झाले नाही. कोकणातील आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास यावेळी राणे यांनी आंबा बागायतदारांना दिला.

दरम्यान, कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्क अहवाल शासनाकडे सादर करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशा सूचना राणे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉ. वी. यु. शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागाच्या विभागप्रमुख डॉ. पुष्पा पाटील, किटकशास्त्रचे विभागप्रमुख डॉ. विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, आंबा बागायदार व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

