पुणे, दि. 8 जुलै : ज्येष्ठ कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांनी ऐतिहासिक दुर्ग वैभवाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. म्हणून त्यांची पुण्यतिथी गडप्रेमीं कडून “दुर्गदिन” म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गोनीदांच्या 25 व्या पुण्यतिथीला इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीरगड (बहादुर गड) येथे 30 चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण करून दुर्गदिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले की, “याच स्थानावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने राक्षसी अत्याचार केले. पण संभाजीराजांनी आपली मान झुकवली नाही. या दैदिप्यमान इतिहासाचा हा धर्मवीर गड साक्षीदार आहे.”
या प्रसंगी गड संवर्धन करणारे पंडित अतिवाडकर यांनी गडावरील मंदिर स्थापत्याची माहिती दिली. तसेच दुर्ग संरक्षण करणा-या गडपाल नंदकिशोर क्षीरसागर आणि भाऊसाहेब घोडके यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या काही वर्षांत संस्थेने परिश्रमपूर्वक गडाचे स्वरूप बदलून टाकले आहे. अप्रतिम शिल्पकलेने समृद्ध मंदिरे, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, नक्षत्रवन या मुळे हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करु लागला आहे. भावी काळात येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे अतिवाडकर यांनी सांगितले.