नायगाव बीडीडी चाळवासियांची स्वप्नपूर्ती, हक्काच्या घराचे स्वप्न साकार! 

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण

मुंबई, दि. 16 मार्च :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला’तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांची चावी व ताबापत्राचे वाटप करण्यात आले.

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा विषय जवळपास चार दशकांपासून प्रलंबित होता. त्यामुळे केवळ खासगी बिल्डरांवर अवलंबून न राहता शासनाने पुढाकार घेत हा प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणींवर मात करत हा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने साकार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वरळी येथील सदनिकांचे वितरण करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात आज नायगाव येथील सदनिकांचे वितरण होत आहे. पुनर्विकासाचे काम अधिक वेगाने पूर्ण करून 2029 पर्यंत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सर्व रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जागेच्या मर्यादेमुळे उद्भवणाऱ्या पार्किंगच्या प्रश्नावरही निश्चित तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईत सध्या जवळपास 1000 एकर क्षेत्रफळावर विविध पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. मुंबईतील मध्यमवर्गीय नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *