कराड (सातारा), दि. ११ मार्च : “छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वैचारिक आदर्शानुसार आपले कार्य उभे करणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर ! संघर्षाच्या त्या काळात आपल्या कर्तृत्वाने अहिल्यादेवी लोकमाता झाल्या. त्यांचे विचार आणि जीवन चरित्र हे आजचा बलशाली समाज उभा करण्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणुनच समृद्ध समाज घडविण्यासाठी सर्वांनी अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे” असे प्रतिपादन संत साहित्याच्या अभ्यासिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ श्यामाताई घोणसे यांनी केले. महिला दिवसानिमित्त कराड मध्ये दिनांक ११ मार्च रोजी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
नुकताच झालेला आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष याचे औचित्य साधून कराडमध्ये स्व. वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये कराड मधील महिला समन्वय समिती आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट द्वारा या विशेष समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यावेळी युरोपात स्त्री मुक्तीसाठी चळवळ सुरू झाली अशा काळात भारतामध्ये अहिल्यादेवींसारखी कर्तृत्ववान राणी राज्य कारभार करून गेली. त्यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभारामुळे आणि प्रजाहितकारी धोरणांच्यामुळे भारतीय प्रजेने त्यांना देवत्व बहाल केले. अहिल्यादेवींनी केवळ धर्मशाळा बांधल्या नाहीत तर त्या प्रत्येक ठिकाणी सुसज्ज अशी सशस्त्र फौज उभी केली. छत्रपती श्री शिवरायांच्या इच्छेनुसार काशी विश्वेश्वर मंदिरापासून ते भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे जीर्णोद्धार केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींची हिंदू धर्मावर आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. आपली श्रद्धा डोळसपणे जपत धर्मामध्ये शिरलेल्या अनिष्ट परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामध्ये सती सारखी प्रथा बंद करण्यासाठी संघर्ष केला. समाजाला लागलेली जातीभेदाची कीड दूर व्हावी यासाठी सर्व जातींना मुक्त प्रवेश असलेल्या विहिरी आणि पाणवठे तयार केले. महिला सक्षमीकरण, स्त्री शिक्षण – स्वावलंबन अशा विषयांमध्ये स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण केला.
पानिपतच्या युद्धामध्ये आपल्याला ज्या कारणामुळे पराभव स्वीकारावा लागला त्या कारणांवर काम करत असताना अहिल्यादेवींनी रस्त्यांचा विकास, पाण्याची उपलब्धता, सैनिकांमधील एकी आणि सैन्याचे सक्षमीकरण या विषयावरती सुद्धा काम केले. अशा अद्वितीय कर्तुत्वामुळेच अहिल्यादेवी या लोकमाता म्हणून नावारूपास आल्या.
भारतीय संस्कृतीला अनुरूप असे महिला सक्षमीकरणाचे आदर्श उदाहरण म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे चरित्र ! म्हणूनच आज आपल्या समाजासमोर असलेल्या विविध आवाहनांना सामोरे जाताना राजमाता अहिल्यादेवींचे चरित्र आपण सर्वांनी आवर्जून अभ्यासावे असे आवाहन यावेळी व्याख्यानादरम्यान प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कराड मधील विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेल्या महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला समन्वय समितीच्या डॉ. सुचिता हुद्देदार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी केले. लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष विजय जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह वैभव डुबल, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, अपर्णाताई पाटील, वृंदा शिवदे यांच्यासह सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महिला प्रतिनिधी आणि कराडकर नागरिक या व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.