विठुनामाच्या गजरात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल

दोन दिवस पुणे भक्तिरसात न्हाऊन निघणार

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यनगरीत आगमन झाले. अखंड विठ्ठलनामाचा गजर करत लाखो वारकरी पायी चालत पालखीसोबत पुण्यात दाखल झाले. आज व उद्या दोन दिवस दोन्ही पालख्यांचे मुक्काम पुण्यात असणार आहेत. पुणेकरांना या दोन्ही संतांच्या सहवासाचे भाग्य लाभणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते आज वाहतुकीस बंद ठेवण्यात आले होते.

संख्येने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीने काल आळंदी येथून प्रस्थान ठेवले होते तर परवा संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहू येथून या प्रस्थान ठेवले होते. आज सायंकाळी दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्या येत्या मंगळवारी २ जुलै रोजी पहाटे पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात आहे. तर संत तुकाराम महाराजांचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात आहे. या दोन्ही मंदिरांच्या परिसरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, सजावट, रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य शिबिरे, मोबाईल टॉयलेट आदी सोयी सुविधांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *