
गेल्या सहा दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी साताऱ्यातील दहिवडी या गावी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटलेला असतानाच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानेही डोके वर काढले आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत मात्र धनगर आरक्षण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याविषयी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत एक विशेष बैठक देखील केली. दहिवडीत उपषोणाला बसलेल्या चारही तरुणांची समजूत काढण्यात यामुळे यश आले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि गोपीचंद पडळकर या दोघांच्या उपस्थितीत या तरुणांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनकर्त्या तरुणांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. गणेशोत्सवानंर याबाबत तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन शंभूराजे देसाई यांनी यावेळी दिले.

