
पालखी विसावा क्र. २, कळसगाव, दि. १६ फेब्रुवारी : वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पारंपारिक पालखी सोहळ्यातील विसावा क्रमांक २ च्या ठिकाणाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ व औसा संस्थेचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी रोड येथील कळसगाव येथे हा विसावा क्रमांक २ मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि खासदार निधीतून बांधण्यात आला आहे.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापू पठारे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, ॲड. रोहिणी पवार, पालखी मालक बाळासाहेब पवार, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रकाशआप्पा मस्के, नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्यासह कळस गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खासदार मोहोळ म्हणाले, “आषाढी वारीच्या शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरेत आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली स्वतः विसाव्यासाठी ज्या जागेवर बसायचे, त्या विसाव्यासाठी माझ्यासारख्या वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्याला योगदान देता आलं, हे मी माझे भाग्य समजतो. विशेष म्हणजे याच गावातून पूर्वी आळंदीच्या मंदिराचा कळस दिसायचा, म्हणूनच या गावाला कळस हे नाव मिळाले, त्यामुळे या गावातील विसाव्यालाही वारी परंपरेत विशेष महत्त्व आहे.”
आळंदी ते पंढरपूर या भक्तीमार्गावरून होणाऱ्या अथक प्रवासात पालखी विसाव्याची ठिकाणे ही केवळ विश्रांतीची ठिकाणे नसतात, तर ती भक्ती, एकता आणि सेवाभावाची केंद्र असतात. कळस येथे उभारण्यात आलेले हे पालखी विसाव्याचे ठिकाण वारकऱ्यांना विश्रांती, सुरक्षितता आणि निश्चितच सोयीसुविधा देईल. त्याचबरोबर हे स्थान भक्ती भाव दृढ करणारे, समाजाला एकत्र आणणारे आणि संतांच्या विचारांचं आदान-प्रदान करणारं केंद्र ठरेल, असा मला विश्वास आहे असे मोहोळ याप्रसंगी म्हणाले.

