दादा लाड, भारतभूषणदास महाराज यांना जनकल्याण समितीचा श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर

 

पुणे, ४ फेब्रुवारी : शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा ३१ वे वर्ष आहे. ‘जनकल्याण समिती’चे कार्यवाह राजन गोर्‍हे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुसंधान क्षेत्रासाठीचा पुरस्कार लाड यांना आणि समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार भारतभूषणदास महाराज यांना प्रदान केला जाईल, असे गोर्‍हे यांनी सांगितले.

प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सिम्बायोसिस विमाननगर येथील एसव्हीसी सभागृहामध्ये होईल.

दादा लाड यांनी कापूस उत्पादनाच्या वाढीसाठी केलेले संशोधन लक्षणीय असून त्यांच्या दादा लाड तंत्रज्ञान संशोधनाला भारतीय कृषी संशोधन परिषेदेनेही (आयसीएआर) मान्यता दिली आहे. ज्वारी, गहू, सोयाबीन आणि तूर लागवड तसेच उत्पादन वाढीसाठीही लाड यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. लाल कंधारी प्रजातींच्या देशी गायींचा प्रसार हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे.

आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांचे समाजप्रबोधनाचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू असून प्रामुख्याने उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमध्ये संत गुरु रविदास यांनी दिलेला संदेश जनमानसापर्यंत पोहोचवून समाज जोडण्याचे त्यांचे कार्य लक्षणीय आहे. समाजातील भेदभाव, कुरीती संपाव्यात यासाठी भारतभूषणदास महाराज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत.

पुणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दादा लाड आणि आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांच्या कार्याला प्रोत्साहित करावे, असे आवाहन ‘जनकल्याण समिती’तर्फे करण्यात आले आहे. संस्थेचे सहकार्यवाह मुकुल पाटगावकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनायक डंबीर, रा.स्व.संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *