देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात : प्रविण पुरी

सक्षमच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप


पुणे : देशात २०१६ मध्ये दिव्यांगांसाठी कायदा येण्यापूर्वी पुण्यातील विविध सेवा संस्था काम करत होत्या, त्यातूनच महाराष्ट्रात निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे देशातील पहिले मंत्रालय आहे. आता इतर देशही त्याचे अनुकरण करत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले.

समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात रविवारी ते बोलत होते. पुण्यातील महर्षी कर्वे संस्थेत दोन दिवस हे अधिवेशन पार पडले.

पुरी पुढे म्हणाले, राज्यात ८५० हून अधिक शाळांमधील ४० हजार दिव्यांगांसाठी शिक्षण दिले जाते. सरकार यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करत आहे.काही स्वंयसेवी संस्था सोबत ही काम करत आहे. पुण्यात मुरलीधर कचरे यांची वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्था, तेथे दिव्यांग मुलांसाठी सुरू असलेले शूटिंग रेंज, लातूर येथील दिव्यांग मुलांसाठी आय टी आय या संस्थांचे काम कौतुकास्पद आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या यशस्वी कथा देशभर पोहोचवा : हिरेमठ

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सेवा विभग प्रमुख आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी आपल्या मुख्य भाषणात दिव्यांग व्यक्तीनी केलेली असामान्य कामगिरी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

हिरेमठ म्हणाले, एकेक दिव्यांग व्यक्ती ही परिपूर्ण कशी बनेल याची जबाबदारी सामान्य समाजाने उचलली पाहिजे. सक्षम या कार्यात पुढाकार घेणारी देशव्यापी संस्था आहे. तत्पूर्वी एकल गीत सादर केल्यानंतर सक्षमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले अधिवेशनात सक्षमचे कार्यकर्ते प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करतील. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार यांचा विशेष सत्कार तसेच एकता अंकाचे प्रकाशन सक्षमचे संरक्षक डॉ. दयालसिंग पवार, राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सदस्य सुहासराव हिरेमठ, संस्थापक मिलिंद कसबेकर, सहसचिव अभय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी संघटन मंत्र सादर करण्यात आले. सुमन चतुर्वेदी यांनी सक्षमच्या दृष्टिकोन आणि संकल्पना याविषयी माहिती दिली. स्वाती धारे यांनी स्वागत केले. महामंत्री उमेश अंधारे यांनी प्रास्ताविक केले. दुभाषी माधुरी गाडेकर यांनी भारतीय सांकेतिक भाषेतून संचालन केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. डॉ. प्रीती पोहेकर यांनी कल्याण मंत्र सांगितला. अंधारे यांनी सक्षमची नूतन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहिर केली.

संत सूरदास, महामुनी अष्टावक्रच्या प्रतिमांनी वेधले लक्ष; सक्षमच्या शोभायात्रेत देशभरातील प्रतिनिधींसह दिव्यांगांचे प्रतिबिंब

सक्षम भारत, समर्थ भारत, जिते जिते रक्तदान, जाते जाते नेत्रदान, सक्षम भारतम्, समर्थम्म भारतम अशा घोषणा देत कर्वेनगरातील मुख्य मार्गावर तब्बल दोन तास निघालेल्या शोभायात्रेतील संत सूरदास, महामुनी अष्टावक्रच्या सहा फुटी प्रतिमांनी रविवारी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले.

दिव्यांगांचे शिक्षण पुनर्वसन, आरोग्य रोजगार व सामाजिक विकास यासाठी देशभरात ४३ प्रांतामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचे विविध प्रांतामधील १५०० प्रतिनिधीसह दिव्यांगांचे प्रतिबिंब या शोभायात्रेत उमटले. कर्वे रोड, उड्डाणपूल, वनदेवी, गांधी भवन सिग्नल, वारजे रोड, वनदेवी, उड्डाण पुल मार्गे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत परत येत सांगता झाली.

या शोभायात्रेत अडॉप्शनसह ५० दिव्यांगांच्या स्कूटरस्वार प्रतिनिधी, ध्वनी व्यवस्थेसह तीन चित्ररथ, चारचाकी वाहने, रिक्षा,१ रुग्णवाहिका सहभागी झाल्या. या शोभायात्रेस नियंत्रित करण्यासाठी १०० स्वयंसेवक सहभागी होते. या शोभायात्रेचे विविध ठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत झाले. दक्षिण भारत, मध्य भारत, उत्तर भारत, पूर्व भारत आणि शेवटी पश्चिम भारतातील प्रतिनिधी त्या त्या राज्यातील पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

तेरा मिनिटांची चित्रफीत ठरली आकर्षण

या शोभायात्रेत सक्षमने तयार केलेली तेरा मिनिटांची चित्रफीत आकर्षण ठरली. याशिवाय नेत्रदान, रक्त दान, अवयवदान याविषयी जागृती करणारे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.

प्रेरणादायी दिव्यांग व्यक्तींचा विशेष सत्कार

दिव्यांग व्यक्तींच्या प्रेरणादायी सफळ कथा देशातील प्रत्येक प्रांतामध्ये सक्षमचे कार्यकर्ते पोहचवतील असा विश्वास मटाले यांनी व्यक्त केला. रविवारी दुपारच्या विशेष सत्रात ते बोलत होते. प्रेरणादायी दिव्यांग व्यक्तिमत्व म्हणून अहमदाबादचे प्रसिद्ध आयटी उद्योजक शिवम पोरवाल, महाबळेश्वरचे प्रसिद्ध उद्योजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भावेश भाटिया, अभिनेत्री गौरी गाडगीळ आणि ३५ वेळा गिर्यारोहण करणारे सागर वसंत बोडके, इंदूरचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंग लोहिया यांचा विशेष सत्कार सक्षमचे संरक्षक डॉ. दयालसिंग पन्वांर, राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह सेवा प्रमुख राजकुमार मटाले, सहसचिव अभय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. महामंत्री उमेश अंधारे यांनी सूत्र संचालन केले. दुभाषा माधुरी गाडेकर यांनी भारतीय सांकेतिक भाषेतून संचालन केले. स्वाती धारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *