मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम समृद्ध व्हावा,गणरायांना साकडे; बाप्पांकडून सकारात्मक, नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया !

मुंबई, दि. १८ :- श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे साकडे घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी यंदाचा हा उत्सव आपण उत्साहात, जल्लोषात आणि उत्सवाचं पावित्र्य राखून साजरा करूया. बाप्पांच्या सेवेत कुठेही कमी राहणार अशी आपण मनोभावे सेवा करतो.त्याचप्रमाणे आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊया. आपल्या परिसराची काळजी घेऊन हा उत्सव साजरा करूया. बाप्पांकडून सकारात्मक आणि नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया. बंधुभाव, सलोखा आणि परस्परातील प्रेम-आदर भाव वाढीस लागेल, असे उपक्रम आयोजित करूया, असे आवाहनही केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी आहे की, श्री गणेशाच्या आगमनातून एक मांगल्यपूर्ण आणि पवित्र वातावरण निर्माण होते. दरवर्षी बाप्पा येतात. पण त्यांचे हे आगमन दरवर्षी आगळे आणि वेगळे भासते. त्यातून आपल्या नव्या आशा-आकांक्षा आणि संकल्पांना ऊर्जा मिळते. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आगळा लोकोत्सव आहे. म्हणून त्याकडे जगाचंही लक्ष लागलेलं असते. यंदाही या उत्सवातूनही आपण जगाला महाराष्ट्राच्या या वेगळेपणाची ओळख करून देऊया, असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे यांनी गणरायांकडून सर्वांच्या आशा- आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना व्यक्त करत उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *