
ढगफुटीमुळे अरुणाचल प्रदेशच्या इटानगर शहरातील अनेक भागात रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामुळे असंख्य घरे व वाहने खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. अरूणाचल प्रदेशच्या राजधानीचे शहर असलेल्या इटानगरमध्ये भूस्खलनाच्या घटनांमुळे वाहने आणि निवासी परिसर प्रभावित झाला आहे. विपरीत हवामान परिस्थितीमध्ये स्थानिक रहिवाशांना जागरूक आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बाधित रहिवाशांना मदत करण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीनंतर व्यवस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन सर्व आवश्यक पावले उचलत आहे. अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यापूर्वी मंगळवारी इटानगरच्या उपायुक्तांच्या कार्यालयाने कारिंग्सा क्षेत्रात सतत पावसामुळे झालेले गंभीर नुकसान लक्षात घेता निर्जुली ते बंडर्डेवा पर्यंतचा रस्ता त्वरित बंद करण्याची घोषणा केली होती.
अरुणाचल प्रदेश राज्यातील बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यानंतर अनेक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात पर्जन्यमानाचा अंदाज यापूर्वीच जारी केला होता. पुढील पाच दिवसांत अरुणाचल प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये वर्तविण्यात आली होती.
पुढील सात दिवसांसाठी देखील हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे की अरुणाचल प्रदेशात बहुतेक ठिकाणी कमी ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

