महात्मा फुले यांचे कार्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

मुंबई, 1 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे सांगत, यानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची मोठी संधी असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका तयार करून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देशही दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान 2 ते 3 कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन 15 एप्रिलपर्यंत मांडण्यात यावे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात 11 एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी सुसज्ज खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीअंतर्गत वर्षभर कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, या कार्यक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी उपसमितीची निर्मिती करावी. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित साहित्यसंपदेचा बहुभाषिक अनुवाद करण्यात यावा, जेणेकरून संबंधित भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध होईल. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांचाही सहभाग सुनिश्चित करावा. तसेच, प्रत्येक मंत्री व विभागाने दिलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *