यंदाचा शिवप्रतापदिन खास … शिवप्रेमींना घडणार छत्रपतींच्या वाघनखांचे दर्शन

शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रात येणार, शिवप्रतापदिनी घेता येणार दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा ज्या वाघनखांनी वध केला ती वाघनखे ब्रिटिश प्रशासनाने भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यंदा शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष सुरू आहे. त्यामुळे अशा प्रसंगी ही प्रेरणादायी वाघनखे महाराष्ट्रात येणे हे विशेष महत्त्वाचे व आनंदाचे आहे असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मुनगंटीवार, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि आर्किओलॉजी विभागाचे डायरेक्टर गर्गे हे तीन जण येत्या १ ऑक्टोबर रोजी लंडनला जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील योगायोगाने काही बिझनेस मिटिंगकरिता त्या दरम्यान तिथेच आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत ३ तारखेला एमओयू होईल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात वाघनखे महाराष्ट्रात घेऊन येणार. त्यानंतर राज्यभरातील नागरिकांना वाघनखे पाहता यावीत यासाठी एक व्यापक कार्यक्रम आखण्यात येणार आहे. वाघनखे हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे कारण त्या वाघनखांना साक्षात शिवछत्रपतींचा स्पर्श झाला आहे. त्यामुळे त्या भावनेतून आम्ही ही वाघनखे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. आमची अशी इच्छा आहे की ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्वतः ती वाघनखे घेऊन भारतात यावे व भारताच्या पंतप्रधानांच्या हातात द्यावीत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबरमध्ये याचे खास महत्त्व आहे कारण १० नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन आहे. त्यामुळे त्या दिवशी ही वाघनखे महाराष्ट्रात यावीत यासाठी आमचा प्रयत्न आहे.

याशिवाय महाराजांची जगदंबा तलवार आणण्याच्या दृष्टीनेही आमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र यामध्ये काही तांत्रिक मुद्दे आले आहेत. त्यामुळे ते मुद्दे लक्षात घेऊन त्यादृष्टिनेसुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *