देशाला संकल्पित मातृशक्तीची गरज : शांताक्का

मातृप्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन

गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता : मातृप्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) मिलिंद शेटे, डॉ. श्रीरंग गोडबोले, शांताक्का, शेफाली वैद्य आणि विनिता तेलंग

पुणे, दि. १३ ऑगस्ट : प्रेम, त्याग आणि आपलेपणाचा भाव म्हणजे मातृत्व होय. भारतीय महिलांमध्ये हे मातृत्व जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंप्रमाणेच आजच्या महिलांमध्ये संकल्पित मातृशक्तीची गरज आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी व्यक्त केले.

येथील गणेश सभागृहात आयोजित ‘मातृप्रेरणा’ विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संस्कृती जागरण मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग गोडबोले, लेखिका शेफाली वैद्य, सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे, अतिथी संपादक विनिता तेलंग आदि उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या स्मृतीवर्षानिमित्त सांस्कृतिक वार्तापत्राच्या वतीने हा अंक प्रकाशित करण्यात आला आहे.

शांतक्का पुढे म्हणाल्या, “क्षमता असतानाही करिअरसाठी मातृत्व नाकारणे योग्य नाही. महिलांनी आई म्हणून राष्ट्र निर्मितीतील आपले कर्तव्य समजून घ्यायला हवे. जागृत देशभक्त नागरिकांच्या निर्मितीसाठी संकल्पित मातृशक्ती गरजेची आहे.”

शेफाली वैद्य म्हणाल्या, “मातृत्व म्हणजे केवळ मुलांना जन्म देणे नाही. तर त्यामागे एक सांस्कृतिक विचार आहे. आपण सर्वस्व ओतून मुलांना स्वयंपूर्ण बनविणे म्हणजे मातृत्व होय. राजमाता जिजाऊ आणि अहिल्यादेवींनी त्यांचे मातृत्व या देशातील नागरिकांना समर्पित केले. केवळ महिलाच नाही तर पुरुषामध्ये देखील मातृत्व असते. म्हणूनच आपण ज्ञानेश्वरांना माऊली असे म्हणतो.”

विविध मार्गाने हिंदुत्वाची तार छेडण्याचे काम सांस्कृतिक वार्तापत्र करते, असे मत मिलिंद शेटे यांनी व्यक्त केले. मेघना घांगरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

शांताक्का म्हणाल्या :

– गरीबी आणि दुःख असतानाही भारतीय मतांचा हॅपिनेस कोशंट जास्त, देशातील ६८ टक्के महिला आनंदी
– बांगलादेशातील मातृशक्ती जागृत झाली म्हणून हिंदुंसह अल्पसंख्याकांचे संरक्षण झाले.
– आई म्हणजे त्यागाची मूर्ती अशी विनोबा भावे यांची शिकवण.
– राष्ट्र आणि प्रजानिर्मिती मातृशक्तीची जबाबदारी
– शुभ अशुभ न पाहता दुःख सहन करत कुटुंबाच्या भल्यासाठी त्याग करणारी भारतीय नारी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *