सशक्त बीजरोपणाने संघ आणि संघाचे विचार वाढले : भैय्याजी जोशी

नाशिक : स्व. नाना ढोबळे यांनी सशक्त बीजे रोवली म्हणून संघकार्य दुर्गम आदिवासी भागात पोहचले. नानांनी जे सशक्त बीजरोपण केले आहे, त्यामुळेच संघ आणि संघाचे विचार अजून वाढले. रा. स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व.नानाराव ढोबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नुकतेच शंकराचार्य संकुलाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी बोलत होते.

प्रत्येक पिढीला संघाच्या मार्गावरून जाण्यासाठी दीपस्तंम लागतात, रा. स्व. संघ मागील शंभर वर्षात भरकटला नाही, याचे मुख्य कारण नानांसारखे दीपस्तंभ होते. आपल्याकडे जे आहे, ते काहीही मागे न ठेवता अर्पण करायचे. काहीही विचार जवळ ठेवायचे नाही, सर्वच्या सर्व इतरांना वाटून टाकायचे. त्यासाठी धुंद वाटा निर्माण करायच्या. ज्याला अंतःकरणाची भाषा समजते, त्याला हिंदू समाज आणि मातृभूमी ही संकल्पना समजते.

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिमत्तेपेक्षाही संवेदना आणि हृदयाची आवश्यकता असते. गेल्या शतकभरात संघाने तथाकथित पुरोगाम्यासारख्या केवळ सामाजिक प्रश्नांच्या चर्चाभोवती रेंगाळणे पसंत केले नाही तर सामाजिक सुधारणेच्या प्रत्यक्ष कृतीचे आदर्श उभे केले. राष्ट्रहितासाठी सर्वस्वाचा त्याग करून आदर्श उभे करणे हे वाटते इतके सोपे कार्य नाही. या राष्ट्रयज्ञात स्व. नानाराव ढोबळे यांसारख्या असंख्य समिधांनी जीवनकार्याची आहुती देऊन समाजासमोर आदर्श उभे केले. नानांनी सशक्त बीजे रोवली म्हणून संघकार्य दुर्गम आदिवासी भागात पोहचले. तसेच अनेक लोक टपून बसले आहेत की संघ कधी संपेल. पण नानांनी जे सशक्त बीजरोपण केले आहे, त्यामुळेच संघ आणि संघाचे विचार अजून वाढले.असेही ते म्हणाले.

भैयाजी पुढे म्हणाले की, प्रखर असणे वेगळे आणि उग्र असणे वेगळे. नाना प्रखर होते उग्र नव्हते. नाना माऊली सारखे मृदू होते. ते अनेक जणांचे पालक झाले, त्यांनी अनेकांच्या वेदना समजून घेऊन त्या सोडवल्या. संघाचे काम खूप करायचे आहे आणि शरीर साथ देत नसल्याची खंत नानांना शेवटपर्यत होती असे भैय्याजी नानांच्या आठवणी सांगताना म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, नाशिक विभाग संघचालक कैलासनाना साळुंखे, रमेश ढोबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौमुदी परांजपे यांनी केले तर प्रास्ताविक गोविंदराव यार्दी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *