राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या सेविकांना मार्गदर्शन
नाशिक : धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्य यांचे रक्षण करणे महणजेच राष्ट्रकार्य होय. “रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग” असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.त्यामुळे आपण कठोर बनून थोडा वेळ हा राष्ट्रकार्यासाठी राखून ठेवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी येथे केले.
राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांसाठी “राष्ट्रकार्यात मातृशक्तीचा सहभाग” या विषयावर एका विशेष बौद्धिक वर्गाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सुदर्शन लॉन्स, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरानगर येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. डॉ. रचनाताई खांडवे यांचे सेविकांच्या मनातील प्रश्न व भैय्याजी जोशी यांनी दिलेली उत्तरे असा हा संवादात्मक कार्यक्रम झाला. यावेळी समितीच्या क्षेत्र अधिकारी शोभा गोसावी, विभाग कार्यवाहिका शुभांगी कुलकर्णी, प्रांत संपर्क प्रमुख सोनीला राव तसेच विभाग सेवाप्रमुख रेखाताई दाणी उपस्थित होत्या.
महिला राष्ट्रकार्यात कोणकोणत्या प्रकारे सहभागी होऊ शकतात, तसेच समितीसाठी वेळ कसा देता येईल, असे प्रश्न स्वयंसेविकांच्या वतीने त्यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की राष्ट्र हा एक विचार आहे. मन हा आपला शत्रू आहे आणि वेळेचे योग्य नियोजन केले तर वेळ मिळतोच. संस्कारांचे महत्त्व जोपर्यंत पालकांना कळत नाही तोपर्यंत ते मुलांपर्यंत पोहोचणार नाही. पुढील पिढी जर संस्कारीत निर्माण करायची असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टी शिकून ऐकून मग त्या मुलांवर बिंबविल्या पाहिजेत. तसेच आपल्या पिढीला सध्या चांगल्या मातांची गरज आहे, कारण आपण प्रथम मातृदेवो भव असंच म्हणतो. भारताच्या परंपरेमध्ये कुशल प्रशासक महिला पहिल्यापासूनच होऊन गेल्या आहेत. जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांनी प्रत्येक सामाजिक प्रश्नांचे निराकरण केले व त्या कुशल प्रशासकही बनल्या होत्या. मंगलयान, चांद्रयान यामध्येही महिला शास्त्रज्ञ होत्या.
आपल्यावर पश्चिमी संस्काराचा खूप प्रभाव पडतोय पण पश्चिमीकरण हे आपण थांबवू शकत नाही. मात्र त्यापासून चांगलं आचरण व व्यवहार कसा राहील हे आपल्याला बघावं लागेल, कारण आपला समाज आता खूपच आत्मकेंद्रित आणि विकृत होत चालला आहे. उपभोगाच्या साधनांची मर्यादा न कळणं हा खरा अपराध आहे. त्यामुळे प्रामाणिक राहून परस्परावलंबन या सूत्राचा जर आपण स्वीकार केला तर संघर्ष व चढाओढ आपोआपच कमी होईल व आपली हिंदू म्हणून जी संस्कृती आहे ती टिकून राहील. वैचारिक प्रबोधन, चांगले वातावरण,चांगली मूल्य,चांगली ठिकाण उभी करणे हे काम तुम्हालाच करायच आहे तसेच कुटुंब प्रबोधन करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
भैयाजी जोशी यांच्या हस्ते देवी अष्टभुजेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहर कार्यवाहिका सौ. सुहासिनी रक्तपारखी यांनी भैय्याजींचे स्वागत केले. कार्यक्रमाला इंदिरानगर भाग व तसेच शहरातील सुमारे 250 सेविका उपस्थित होत्या.