राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामध्ये वैचारिक मंथन

बारामतीच्या माध्यम संवाद परिषदेत उमटला सूर

बारामती, १७ सप्टेंबर २०२३ : विश्व संवाद केंद्र, पुणे आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ. प. शिरीष महाराज मोरे, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे राहुलशेठ वाघोलीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिपकजी पेशवे आणि डॉ. पोपटराव शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामध्ये वैचारिक मंथन व्हावे हा यामागचा हेतू होता. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारितेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रा. विक्रम शिंदे यांनी प्रास्ताविकात विश्व संवाद केंद्राची थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर राहुल वाघोलीकर यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, प्रसारमाध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, प्रत्येक पत्रकार बंधूंनी अभ्यासपूर्ण मत मांडावे, त्यानंतर ह.भ. प. शिरीष महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शिवकालीन इतिहासाचे दाखले देऊन इतिहासातील अप्रकाशित वास्तवावर प्रकाश टाकला. हिंदवी स्वराज्याच्या कार्यात अनेक यावनी सत्ताधीशांशी खुप संघर्ष करावा लागला. त्याचे विस्मरण होऊ न देता प्रत्येक माध्यमकर्मीने आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. तथ्यहीन विचार पसरवून शिवजन्मापूर्वी सर्व काही आलबेल होते, असा चुकीचा विचार मांडला जातो, तसेच शिवकाळातील संघर्ष हा धार्मिक स्वरुपाचा नसून तो राजकीय स्वरूपाचा असल्याचा खोटा विमर्श पसरवला जातो आहे, यावर उपाय म्हणून सर्वांनी स्वराष्ट्र, स्वधर्म आणि स्वभाषा आधारित शिवचरित्राचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

त्यानंतर आलेल्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी प्रश्नोत्तरे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पांडकर यांनी केले आणि अजय धुमाळ यांनी आभार मानले. सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *