श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक महान संत आणि तत्त्वज्ञानी होते. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे ते मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्री मध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. श्री राघवेंद्र स्वामी हे भगवान विष्णूचे भक्त प्रल्हाद यांचे अवतार मानले जातात. आंध्र प्रदेशातील मंत्रालयम् येथील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे.
श्री राघवेंद्र तीर्थ यांचे जन्मनांव वेंकटनाथ. त्यांचा जन्म सध्याच्या तमिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक देशस्थ मध्व ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मवर्षाविषयी पुरेसा आधार नसल्याने तो १५९५ ते १६०१ दरम्यान झाला असावा असे अनुमान आहे. त्यांना प्राथमिक शिक्षण, त्यांचे मेहुणे लक्ष्मीनरसिंहाचार्य ह्यांनी दिले. पुढे ज्ञानार्जनासाठी त्यांना कुंभकोणम् येथे पाठवले गेले. त्यांचे गुरू सुधींद्रतीर्थ यांनी तंजाउर गावी संन्यास देऊन त्यांचे ‘राघवेंद्र तीर्थ’ हे नूतन नाव ठेवले. राघवेंद्रांनी आपले गुरू सुधींद्र तीर्थांकडून, श्री मठाचे मुख्य म्हणून धुरा स्वीकाराल्यावर मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी संपूर्ण दक्षिण भारतात प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी अनेक अद्भुत चमत्कार केले. तसेच अनेक ग्रंथ रचना केल्या. त्यांचा ‘सुधा परिमल’ हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. म्हणूनच त्यांना परिमळ आचार्य अशी पदवीने गौरविण्यात आले.
1671 साली त्यांनी मंत्रालय येथे जिवंत समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांच्या शिष्यांना त्यांनी पुढील ८०० वर्षं आत्मरूपाने शाश्वत राहण्याचे वचन दिले. स्वामींनी समाधिस्थ होण्यासाठी ही जागा व ही शिळा निवडली कारण, येथे श्री रामचंद्र सीतेच्या शोधासाठी निघाले असता या शिळेवर सात घटिका विश्राम केला होता असे इतिहास सांगतो. श्री राघवेंद्र स्वामींचे समाधिस्थान मंत्रालयम् हे आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात कर्नाटक राज्याच्या सीमेवर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले अतिशय पवित्र स्थान आहे.
श्री राघवेंद्र तीर्थ स्वामी महाराज यांनी एकूण 23 ग्रंथांची रचना केली. श्री राघवेंद्र स्वामी यांचे जीवन आणि शिकवण अध्यात्मिक साधकांना प्रकाश देण्याचे काम करत आहे. कर्नाटकात मानल्या जाणाऱ्या पारंपरिक हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीयेला दरवर्षी आराधना आयोजित केली जाते. श्री राघवेंद्र स्वामी यांची आराधना साजरी करताना त्यांचे भक्त अत्यंत उत्साहाने त्यांच्या वृंदावनाला अभिषेक, अलंकार, भोजन, रथोत्सव, पालखी सेवा इ. अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी करतात. हे कार्यक्रम सबंध भारतात आणि परदेशात आयोजित केले जातात. त्यांचा वारसा, त्यांची शिष्य परंपरा आजही अखंडित सुरू आहे आणि आजही असंख्य भक्तांना प्रेरणा आणि प्रचिती देत आहे.