समानतेचा संदेश देणारे : शंकरदेव

शंकरदेव (१४४९-१५६९)

ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी अलिपुखुरी नावाच्या छोट्या गावात इ. स. १४४९ मधे शंकरदेवांचा जन्म झाला. त्या काळात आसाममधील लोकस्थिती अत्यंत अवनत दशेला पोहोचली होती. तिथं छुतिया, कचारी, भूयान/भुइया, आहोम असे चार राजवंश सत्ता गाजवत होते. त्यांच्या आपसातील यादवीमुळे आसामी जीवन दोलायमान झालं होतं. एकीकडे राज्यकर्त्यांचा जुलूम शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे परस्परविरोधी आचारविचार सांगणाऱ्या पंथोपपंथांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे तिथलं धार्मिक-सामाजिक जीवनही गढूळ बनलं होतं. या पार्श्वभूमीवर, एकशरणीया नामक वैष्णवपंथाची स्थापना करून शंकरदेवांनी संपूर्ण आसामला श्रद्धा- संस्कृतीच्या गोफात गुंफण्याचं कार्य केलं.

आसामातील विस्कटलेल्या समाजजीवनाला वळण द्यायचं असेल तर राजकीय दुरवस्थेवर बोट ठेवत असतानाच बुरसटलेल्या धार्मिक रीतींनाही छेद दिला पाहिजे हे लक्षात घेऊन एकशरणीया वैष्णवपंथाची स्थापना करण्याचं काम शंकरदेवांनी केलं. या पंथाची तत्त्वं बंदिस्त राहू नयेत व या पंथाचा प्रसार व्हावा म्हणून सामान्यांना कळेल असं ग्रंथलेखन व नाट्यनिर्मितीही त्यांनी केली हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य मानावं लागेल.

आसाममधील विस्कळित समाजजीवनाचं निरीक्षण केल्यावर शंकरदेवांना असं जाणवलं की विविध धर्मपंथांतील सदविचार घेऊन विष्णूच्या उपासनेला प्राधान्य देणाऱ्या नव्या पंथाची स्थापना करावी. हा विचार पक्का झाल्यावर त्यांनी या पंथाच्या तीन तत्त्वांची आचारसंहिता प्रसिद्ध केली. सत्संग, नाम (भगवंताचं नामस्मरण) व एकशरणता (एकाच देवाची अनन्य भक्ती) या तीन सोप्या तत्त्वांमुळे शंकरदेवांचा एकशरणीया/महापुरुषिया नामक वैष्णवपंथ आसामात वेगाने विस्तारू लागला. ब्रह्मपुत्रेतील माजुली बेटाच्या परिसरातही हा पंथ फोफावला. पण जसजशी या पंथाची भरभराट झाली तसा तत्कालीन ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लागू लागला. ‘शंकरदेवांनी धार्मिक व सामाजिक समतेचा पुरस्कार करून ब्राह्मण व अस्पृश्य यांना एका पंक्तीत आणलं. एकशरण भक्तीला अग्रस्थान देऊन विष्णूचं महत्त्व वाढवलं आणि सरसकट समाजाला ईश्वरभक्तीचं स्वातंत्र्य दिलं’ ही तेव्हाच्या धर्ममार्तंडांच्या क्रोधाची कारणं होती.

आपल्या संप्रदायाच्या प्रचारासाठी शंकरदेवांनी साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, वक्तृत्व, अभिनय, चित्रकला अशा सर्व माध्यमांचा उपयोग करून घेतला. आपले विचार सामान्य माणसाला आकलन व्हावेत यासाठी सोप्या भाषेत आविष्कृत व्हावेत असा त्यांचा प्रयत्न असे. वैष्णवपंथ हा एकशरणीया असल्याने त्याचं उपास्यदैवत फक्त कृष्ण आहे. त्यातही इथे पूजली जाणारी कृष्णदेवता राधेशिवाय आहे त्यामुळे अन्य वैष्णवसंप्रदायात आढळणारे शृंगारिक लीलाविलास नव्या संप्रदायात अभिप्रेत नाहीत हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात शंकरदेव यशस्वी झाले.

नव्या संप्रदायाच्या प्रसारासाठी शंकरदेवांनी विविध ग्रंथ लिहिले. स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती करत असतानाच भागवत पुराणाच्या काही भागाचा (स्कंद १-३, ७-१०,१२) असामिया भाषेत अनुवाद केला. दुसरीकडे, देव, धर्म, नीती, भक्ती, वेदान्त, अध्यात्म यांच्या सुलभ प्रकटीकरणासाठी शंकरदेवांनी बडगीतांची निर्मिती केली. या बडगीतांमध्ये त्यांनी मैथिली- असामिया यांच्या मिश्रणातून जन्मलेली ‘ब्रजबुली’ नामक नवीन भाषा वापरली आहे. सामान्यातील सामान्य माणसालाही आपल्या नव्या संप्रदायाकडे आकषून घ्यावं म्हणून ‘अंकिया नाट’ सारख्या (गद्य- पद्यमिश्रित एकांकी नाटक) कलेचा शंकरदेवांनी आधार घेतला. अंकिया नाटांच्या रचनेमुळे शंकरदेव आसामी जनतेच्या गळ्यातला ताईत बनले आणि त्यातून असामिया रंगमंच व संगीत-नृत्य-चित्रकलांना नवा आशय मिळवून दिला. या विविध माध्यमांच्या व कलांच्या आधारे एकशरणीया वैष्णवपंथाचं वेगळेपण लोकांपर्यंत पोहोचवून त्यातून समानतेचा संदेश देऊन तत्कालीन समाजजीवनाला वेगळं वळण देण्याचं महत्त्वाचं काम शंकरदेवांनी केलं आहे.

 

सौजन्य – श्री सेवा फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *