नवी दिल्ली, ३ जानेवारी – जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालेला असला तरीही नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर अधिक सजगपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी काल बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहशतवाद्यांच्या संपूर्ण इको सिस्टीमचे कंबरडे मोडण्यासाठी सर्व त्या मार्गांचा अवलंब करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, लष्करप्रमुख, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तसेच सशस्त्र दले व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा दृष्टिकोन अवलंबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी बैठकीदरम्यान केला. यावेळी त्यांनी राज्यातील सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा, सुरक्षा यंत्रणांच्या क्षेत्रीय योजनेचा आढावा घेतला. राज्यातील असुरक्षित भाग ओळखून तिथे योग्य सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याविषयी त्यांनी सांगितले. राज्याच्या एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
गेल्या काही काळात दहशतवादी घटांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे शाह यांनी यावेळ नमूद केले. तसेच घुसखोरीचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कायद-सुव्यवस्थेतील सुधारणेचे त्यांनी यावेळी कौतुक केले. तसेच सुरक्षा यंत्रणा व प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करतानाच त्यांनी सतर्क राहण्याचा सल्लाही उपस्थितांना दिला.