आंबेडकर, सावरकर व अण्णा भाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते : पद्मश्री दादा इदाते


निगडी (पुणे), दि. १० मार्च : “स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी इंग्लंडमधून भारतात पिस्तुल पाठवल्या प्रकरणी त्यांना इंग्लंड मधून अटक करुन भारतात समुद्रामार्गे आणत असताना सावरकरांनी फ्रान्सजवळ बोटीतून समुद्रात उडी मारुन फ्रान्सच्या हद्दीत जाण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पकडले. पुढे त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यास पाठवले गेले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा व सावरकरांचा विषय आंतरराष्ट्रीय विषय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात ‘कास्ट इन इंडिया ‘हा आपला पहिला प्रबंध सादर केला. ही घटना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या देशातलं मोठं दुखणं हे जातीव्यवस्था आहे.

जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर दलितांनी मंदिर प्रवेश केला पाहिजे अशी भूमिका त्यांची होती. तर अण्णा भाऊ साठे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. सुरुवातीच्या काळात काॅ. डांगेच्या प्रभावामुळे त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. पण पुढे ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराकडे आकर्षित झाले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.

महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात अण्णाभाऊ साठे सांचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने वि‌द्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली. पुढे रशियामध्ये जाऊनही त्यांनी भारतीय भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले आहे. ही घटना आंतरराष्ट्रीय कीर्तीची आहे त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे, आंतरराष्ट्रीय स्तराचे नेते होते असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी मातंग साहित्य परिषद पुणे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व समरसता गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीतील विचारसूत्रे” या विषयावरील परिसंवादात व्यक्त केले.

तर या प्रसंगी माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले की, “हिंदू धर्मातील गावकी एक आहे, पण भावकी एक नाही. ही भावकी एक करण्याचे महान कार्य हे स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीने केली आहे. सामाजिक चळवळीचे त्यांचे मार्ग भिन्न आहेत. पण त्यांच्या सामाजिक चळवळीचे सुत्र समान असल्याचे पाहण्यास मिळते. पुर्वी सकल हिंदू बंधू बंधू हा आमचा व्यवहार नव्हता पण या तिघांच्या सामाजिक चळवळीमुळे आम्ही काल जिथे होतो आता तिथून पुढे आलो आहोत.आमच्यात आता सकल हिंदू बंधू बंधूचा भाव प्रत्यक्ष व्यवहारात वाढला आहे.त्याच्या मागे ह्या महापुरुषांचे कार्य आहे.”

स्वात्यकी सावरकर म्हणाले की “गुण, शील, प्रिती या निकषावर आधारीत सावरकरांनी १५ आंतरजातीय विवाह लावून समरसतेचे बीज रोवण्याचे महान कार्य केले आहे. दलितांच्या दर्शनाने देव बाटतो, तो देवच नाही अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती व त्यासाठी पुर्वस्पृश्यांसाठी त्यांनी अनेक मंदिरे खुली केली आहेत. त्यांनी अस्पृश्य समाजासाठी पूर्वास्पृश्य असा नवा शब्दप्रयोग केलेला आहे. पूर्वास्पृश्यांची भजनी मंडळे पालखीच्या पुढे राहतील असा त्यांचा आग्रह असायचा. त्याच बरोबर त्यांनी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले. पूर्वास्पृश्यांना अनेक व्यवसाय सुरू करून दिले असून अशा ठिकाणीच ते समाजातील अन्य लोकांना त्यांच्या भेटीसाठी बोलावीत असत. वेदांवर सगळ्यांचा अधिकार आहे अशी त्यांची ठाम भूमिका होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माची चिकित्सा केलेली आहे तर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जात व्यवस्थेला विरोध केलेला आहे. भगवद्गीतेत चार वर्णाचा उल्लेख आलेला आहे. परंतु जातींचा उल्लेख कुठेही आलेला नाही असे असताना जात व्यवस्था निर्माण करून भगवंतांचा अपमान हा तथाकथित सनातनवाद्यांनी केला आहे अशी सावरकारांची भूमिका होती. त्या मुळेच सावरकर जात व्यवस्था मानत नव्हते व जोपर्यंत सातबेड्यांमधून हिंदू समाज मुक्त होणार नाही तोपर्यंत जात व्यवस्था संपणार नाही अशी कणखर भूमिका सावरकरांनी घेतली होती.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय भिसे तर आभार सागर पाटील यांनी मांडले. सूत्रसंचालन समृद्धी पैठणकर यांनी केले. याप्रसंगी निलेश गद्रे, विलास लांडगे, डॉ. माणिक सोनवणे, अनिल सौंदाडे, डॉ. हेमंत देवकुळे, युवराज दाखले, नाना कांबळे, शंकर खडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवादाला प्रचंड प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *