डिपेक्स २०२५ : नाविन्यपूर्ण संकल्पनांचे भव्य प्रदर्शन
पुणे, दि. ६ एप्रिल : कुतूहल आणि शैक्षणिक प्रशिक्षण यांचा संगम हा नाविन्याच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले की तंत्रज्ञान आणि उद्योग निर्माण करण्याची ही सुवर्णवेळ आहे असे मत डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, सी.ओ.इ.पी. टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित डिपेक्स २०२५ च्या ३४ व्या आवृतीच्या चौथ्या दिवशी समाजावर प्रभाव टाकणाऱ्या शैक्षणिक संशोधनावर आणि उद्योगांच्या समस्यांशी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रकल्पांवर संयुक्त चर्चासत्र आयोजन करण्यात आले. या सत्रात त्यांनी आपले विचार मांडले. उद्योग आणि शैक्षणिक संशोधन यामध्ये मोठा दरी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या सत्रामध्ये प्रमुख व्यक्ते म्हणून वालावलकर एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. राहुल वालावलकर, अर्कलाइट स्पेशालिटी लॅम्प्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अविनाश कुलकर्णी, सी.ओ.इ.पी. टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणेचे उपकुलगुरू डॉ. सुनील भिरुड, सावी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीसचे कार्यकारी संचालक विकास पाटील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे प्रशिक्षक संतोष गुरव उपस्थिस्त होते.
डॉ. राहुल वालवलकर यांनी स्वच्छ ऊर्जा व्यावसायिक करण्याच्या अनुभवावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानात नाविन्याने याला व्यावसायिक वापरासाठी सक्षम बनवू शकते. डॉ. वालवालकर यांनी विभागीय संवादाचे महत्त्व सांगितले आणि ते समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
संतोष गुरव यांनी डिपेक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि उद्योगांना नवीन दिशा मिळत असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी सांगितले की, वर्तमान पिढी तंत्रज्ञानासंबंधी चांगली प्रगल्भता दाखवते, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा आवश्यक आहे. गुरव यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अभ्यासक्रमाच्या सुधारणा आणि अद्ययावततेची तातडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
विकास पाटील यांनी उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्रातील आपला बहुमूल्य अनुभव शेअर केला आणि उद्योग व औदयोगिक शिक्षण यामधील सहकार्याचे महत्त्व सांगितले.
चर्चासत्राचा समारोप डॉ. सुनील भिरुड, उपकुलगुरू, सी.ओ.इ.पी. टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे यांनी केला. त्यांनी सर्व चर्चांचा सारांश देत, भविष्यकाळासाठी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्राचे यशस्वीपणे संचालन शाम अर्जुनवाडकर यांनी केले.