सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल, स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात मोठी क्रांती!

मुंबई, दि. 27 मार्च : स्वयं-पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मुंबईत जवळपास 1600 स्वयं-पुनर्विकासाच्या योजना सुरू आहेत, तर त्याच्या दुप्पट योजना प्रतीक्षेत आहेत. MITRAच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांना सुलभतेने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांतून मोठी क्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे कन्नमवार नगर, विक्रोळी येथील द मुंबई जिल्हा को. ऑप. हौसिंग फेडरेशन लि. संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन आणि प्रतिक्षा नगर, सायन येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित सहकार भवनाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात देशात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात आहेत. या सहकारी संस्थांमध्ये सर्वात मोठा वाटा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा आहे. कोणालाही सहकार विभागाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यक्ष व सचिव यांच्या अडचणी दूर करण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच कार्यालयाच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचा मालक करण्याचा निर्णय घेतल्याने पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
लाडक्या बहिणींसाठी राज्यातील पहिली योजना मुंबै बँकेने तयार केली. आतापर्यंत 2000 लाडक्या बहिणींना मुंबै बँक, महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यात आली. तसेच समाजातील विविध घटकांना वित्तपुरवठा करून सक्षम बनवण्याचे काम मुंबै बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अभ्युदय नगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगर, सायन येथील रहिवाशांना उत्तम घरे देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

