सरस्वती मंदिर संस्थेतर्फे सुनीता रामचंद्र गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे, दि. १ ऑगस्ट : राष्ट्राला आपोआप परमवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी सेवाकार्य ही पूर्वअट आहे. अशा सेवाकार्यांतूनच समरस समाज उभा राहील, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी केले.
सरस्वती मंदिर संस्थेच्या वतीने बस्तर (छत्तीसगड) या आदिवासीबहुल भागात प्रदीर्घकाळ कार्य करणाऱ्या सुनीता रामचंद्र गोडबोले यांना ‘सेवाव्रती जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष विनायक आंबेकर, सचिव अविनाश नाईक, सहसचिव सुधीर चौधरी, रवींद्र जोशी उपस्थित होते.
क्षीरसागर पुढे म्हणाले, “अभावग्रस्त समाजात कर्तव्याचे भान देण्याचे काम असे पुरस्कार करतात. संस्थेने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अशा पुरस्कारांची योजना केली हे कौतुकास्पद आहे. अशा सेवाव्रती पुरस्कारांमुळे समाजाला सेवेची प्रेरणा मिळते.” उच्च शिक्षणानंतरही दुर्गम आदिवासी भागात कार्य करणाऱ्या सुनीताताईंनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे, असे गौरवद्गार दिलीप क्षीरसागर यांनी काढले. ते म्हणाले, “करुणा, कर्तव्यभावना आणि समरसतेच्या भावनेतूनच अशा उपेक्षित, वंचित व मागास बांधवांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. संस्कार, आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन व संघटन या माध्यमातून उर्वरित समाजाशी समरस होण्यासाठी सुनीताताई कार्यरत आहेत.” अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याशी जोडलेल्या सुनीता गोडबोले यांनी आपले संपूर्ण आयुष्यच आदिवासी समाजाच्या सेवेसाठी वाहिले. लग्नानंतर गोडबोले दाम्पत्य १९९० मध्ये दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर परिसरात स्थायिक झाले. सध्या ते आरोग्य आणि बालकांच्या कुपोषण निवारणासाठी काम करत आहेत. अनिल शिदोरे यांनी स्वागत केले, प्रतिमा काळे यांनी सरस्वती वंदना सादर केली, विनायक आंबेकर यांनी प्रास्ताविक केले आणि अविनाश नाईक यांनी आभार मानले.
नक्षलवादी संपतील, नक्षलवादाचे काय?
सरकार आणि सुरक्षा दलांच्या मोहिमांमुळे नक्षलवादी संपतील, पण नक्षलवाद संपविण्यासाठी आपल्यालाच काम करावे लागेल, असे मत बस्तर भागात कार्य करणाऱ्या सुनीता गोडबोले यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव नसलेल्या आदिवासी समाजात सर्वच क्षेत्रांत खूप समस्या आहेत. अतिडाव्या नक्षली चळवळींमुळे सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाली आहे. २००२ च्या ‘सलवा जुडूम’ नंतर सर्वत्र पडझडीची स्थिती आहे. आदिवासी समाजाचे दुःख बाजूला ठेवून शिक्षण, आरोग्य, कुपोषण आदी क्षेत्रांत कार्य करावे लागेल.” आदिवासी भागातील सेवाकार्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील तरुणांनी सहभाग वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.