खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान

 

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला भेट देत श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानचे अध्यक्ष – प्रमूख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त राजेंद्र खेडेकर, विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अॅड. विश्वास पानसे, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, विश्वस्त पोपट खोमणे, पदसिद्ध विश्वस्त तथा तहसिलदार विक्रम राजपूत, व्यवस्थापक आशिष बाठे उपस्थित होते. देव संस्थान आणि जेजूरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रांत संघचालक नाना जाधव उपस्थित होते.तसेच यावेळी स्वागत मंगेश घोणे, प्रास्ताविक अनिल सौंदडे यांनी केले. तर मानपत्राचे वाचन पोपट खोमणे यांनी केले. सरसंघचालकांनी यावेळी देवाचा तळी भंडारा केला. यावेळी देवाच्या खंडा तलवारीची कसरत त्यांनी पाहिली.

गडावर येत्या काळात नवीन भक्तनिवास उभारण्यात येणार असून, गुरूकुल पद्धतीचे शिक्षणही उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमूख विश्वस्त सौंदडे यांनी यावेळी दिली.

समरसतेच्या कार्यासाठी मानपत्र ः
देव, देश, धर्म टिकावा म्हणून मंदिर, पाणी आणि स्मशान या विषयांवर समरसतेचे वातावरण तयार करण्यासाठी देशभर अग्रेसर म्हणून कार्य करत आहात. म्हणून हे मानपत्र प्रदान करण्यात आल्याचे देव संस्थानने म्हटले आहे. ज्यांनी वर खेचायचे आहे त्यांनी थोडे वाकले पाहिजे, ज्यांना वर यायचे आहे, त्यांनी थोड्या टाचा उंच केल्या पाहिजेत. त्याच वेळेस समता आणि समरसता प्रस्तापित होईल, या सरसंघचालकांच्या विधानाचाही मानपत्रात स्थान देण्यात आले आहे. श्री खंडेरायाची पगडी, घोंगडे आणि भारतमातेच्या प्रतिमेने संरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले.

द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खंडोबा देवाची प्रमूख १२ ठाणी आहेत. याचे दर्शन जेजूरीत येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने देव संस्थान आणि पूरातत्व विभागाच्या वतीने द्वादश मल्हार दर्शन सृष्टी उभारण्याचे कार्य होणार आहे. त्याचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले.

 

भौतिक जगातील वैभवाबरोबरच आध्यात्मिकतेतील प्रविणता सांगणारा आपला धर्म आहे. जेजूरी गडाच्या परिसरात परकीय आक्रमक स्वस्थपणे झोपू शकला नाही. धर्म ज्या श्रद्धेमुळे आहे. त्याची जागृती करणारे हे ठिकाण आहे. – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व.संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *