केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार समन्वय बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदा घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली होती. संघप्रणित संघटनांमध्ये काम करणाऱ्या संघटनांचे प्रमुख अधिकारी यात सहभागी होत असल्याने बैठकीला विशेष महत्त्व आहे. या सर्व संस्था सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रात लोकशाही पद्धतीने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक कार्य करत आहेत.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या कामाची माहिती व अनुभव यांची देवाणघेवाण करतील. राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांच्या संदर्भात सध्याची परिस्थिती, अलीकडच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या इतर आयामांवरील योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सर्व संघटना चर्चा करतील.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे आणि सहाही सहसरकार्यवाह बैठकीला उपस्थित असतील. तसेच संघाचे इतर प्रमुख अधिकारी यात सहभागी होणार आहेत. या बैठकीत राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यासह विविध संघ प्रेरित 32 संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटना मंत्री आणि प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.