पुणे, दिनांक 10 ऑगस्ट : बांगलादेशातील सत्तासंघर्षात हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्यांकाविरोधात वंशविच्छेदाच्या घटना घडत आहे. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी संध्याकाळी नामदार गोपळ कृष्ण गोखले चौकातील कलाकार कट्ट्यावर विद्यार्थ्यांच्या वतीने कॅंडल मार्च आयोजित करण्यात आला होता. डेमॉक्रॉसी वॉक संघटनेतर्फे युनाइट फॉर ह्युमॅनीटी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
आयएलएस विधी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, एफटीआयआय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोखले इन्स्टिट्यूट आणि सिंबायोसिस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. विवेक विचार मंचाचे भरत आमदापुरे यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या धार्मिक अत्याचाराची दाहकता मांडली. विभूती चंद्रात्रे, आदित्य सिद्धा आदी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून आणि विविध पोस्टर्सच्या माध्यमातून आक्रोश व्यक्त केला. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.