हिंदू स्वयंसेवक संघाच्या वतीने बंगलुरुमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यकर्ता विकास वर्गाचे आयोजन
बंगळुरु : हिंदू स्वयंसेवक संघाच्या विश्व कार्यकर्ता विकास वर्ग -1 या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे बंगळुरु येथील जनसेवा विद्या केंद्रात समापन झाले. या गतिमान अभ्यासक्रमात 19 देशांतील 200 समर्पित शिक्षार्थी सहभागी झाले. यात अमेरिका, इंग्लंड, जपान, न्यूझीलंड आणि युरोपमधील स्वयंसेवकांचा समावेश होता. या वर्गात बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षणाचा संगम झाला होता. त्यात हिंदू जीवनपद्धतीच्या समृद्ध वारसा आणि शिस्तीचे प्रदर्शन झाले.
घोष पथकाच्या वतीने सादर करण्यात आलेली अप्रतिम सिम्फनी हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. बासरी आणि ट्रंपेट यासारख्या अभिजात भारतीय वाद्यांचा क्लॅरोनेट व सॅक्सोफोन यांसारख्या पाश्चात्य वाद्यांशी मेळ घालण्यात आला. पूर्व आणि पश्चिमेच्या या मिलाफामुळे सर्व उपस्थितांना एका भारावून टाकणारा सांगितिक अनुभव मिळाला.
यावेळी स्वयंसेवकांनी योगासनांच्या माध्यमातून आपली शारीरिक क्षमता प्रदर्शित केली. सूर्यनमस्कारांसह त्यांनी मनोहारी रचना सादर केल्या. त्यानंतर शिस्त आणि एकतेचे प्रदर्शन घडविणाऱ्या समता प्रात्यक्षिके झाली. यावेळी सेविका गणांनी आत्मरक्षणाची प्राचीन कला असलेल्या नियुद्ध या प्रकारातील आपले नैपुण्य दाखविले. त्यानंतर लेझीम प्रात्यक्षिकातून त्यांनी चपळता व समन्वय यांचे प्रदर्शन घडविले. स्वयंसेवक आणि सेविका या दोघांनी एकत्र येऊन लाठीचा पारंपारिक दंड व्यायाम सादर केला. त्याद्वारे त्यांनी आपल्या गटाचे सामर्थ्य व एकता प्रदर्शित केली.
अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सदिच्छा दूत रिकी केज, रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. भगवती प्रकाश आणि हिंदू स्वयंसेवक संघ, न्यूझीलंडच्या अनुपमा चिट्टी उपस्थित होते.
मार्गदर्शनपर संबोधनात दत्तात्रेय होसबाळे यांनी जगभरात हिंदूंची वस्ती असल्याचे अधोरेखित करून 150 पेक्षा जास्त देशांमध्ये एक अब्जापेक्षा जास्त हिंदू राहत असल्याचे नमूद केले. हिंदू संघटनांनी समाजात सकारात्मक बदल करण्याची गरज असल्याचे सांगून, ते म्हणाले की हिंदू जीवनपद्धतीकडे सर्वसाधारणपणे सन्मानाने पाहिले जाते. या जीवनपद्धतीने जागतिक संस्कृतीला, विशेषतः संगीताच्या माध्यमातून, मोठे योगदान दिले आहे. हिंदू हे कायदा पाळणारे आणि शांतताप्रेमी नागरिक असल्याचा गौरव करून होसबाळे म्हणाले की, हिंदू ज्या देशात जातात त्या देशाचा आदर करतात आणि तिथे कधीही ते ओझे ठरत नाहीत. जगभरात या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पर्यावरणाचे प्रश्न तसेच सामाजिक मुद्द्यांसारख्या आव्हानांचे निराकरण हिंदू जीवनपद्धतीच्या तत्त्वांद्वारे परिणामकारकपणे करता येऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. तसेच परदेशातील हिंदूंच्या वतीने स्थानिक समुदायासाठी सेवेचे उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक सहयोगी जाळे उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
संबोधनात संयुक्त राष्ट्रसंघाचे सदिच्छा दूत रिकी केज यांनी आपल्या जीवनावर वडिलांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. आपले वडील डॉक्टर होते आणि म्यानमारमध्ये असताना महाविद्यालयीन जीवनात ते संघाशी जोडले गेले होते. ते आपल्यासाठी प्रेरणा देणारे ठरले, असे त्यांनी सांगितले. भारतातील तसेच परदेशात राहणाऱ्या भारतवंशीय नागरिकांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून आपल्या मुलांशी पुन्हा जोडून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून साधी जीवनशैली आणि कचरा कमी करणे ही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक पावले आहेत, असे ते म्हणाले. सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि शाश्वत जीवन पद्धती यांच्यात संतुलन साधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
या वर्गाचा अभ्यासक्रम 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान पार पडला. यात एकात्म मानव दर्शन, संघ विचार आणि समाज विचार अशा विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच सरसंघचालक मोहन भागवत जी, डॉ. मनमोहन वैद्य आणि सेविका प्रमुख शांताक्का यांसारख्या मान्यवरांनी या वर्गाला भेट दिली.
या वर्गात डेटा सायंटिस्ट, उद्योजक आणि शिक्षक इत्यादी सहभागी झाले होते. त्यांनी हा समृद्ध करणारा अनुभव असल्याचे सांगितले. न्युझीलंडमधील एका सहभागी कार्यकर्त्याने हा वर्ग हा आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा अनुभव असल्याचे सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका सहभागी कार्यकर्त्याने उत्तम निवास व्यवस्था तसेच मातृभोजनाच्या हृदयंगम अनुभवाचे वर्णन केले.
हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य पुढे नेण्याची स्वयंसेवक आणि सेविकांनी पुन्हा कटिबद्धता व्यक्त करून विश्व कार्यकर्ता विकास वर्गाची सांगता झाली. सेवा आणि एकता या मूल्यांचे रक्षण करणाऱ्या एका जागतिक हिंदू समुदायाला त्यामुळे चालना मिळाली.