सेवा भारती आणि विविध संघटनांच्या मदतीने मदतकार्य
पुणे : अतिवृष्टीमुळे पुण्यातील नदीपात्रालगतच्या वस्तीत पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो कुटुंबांची अक्षरशः वाताहात झाली. पूरस्थितीचे गांभीर्य ओळखून संघ स्वयंसेवक त्यांच्या मदतीसाठी धावले. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यापासून ते साहित्य वाटपापर्यंत अनेक कामे स्वयंसेवकांनी विविध संघटनांच्या मदतीने केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा भारती आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यात आले. 26 जुलै रोजी मंगळवार पेठ, ताडी वाला रस्ता परिसरातील सकल भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांनी तात्पुरते स्थलांतर केले होते. तिथे पिंपरी येथील इस्कॉन मंदिराच्या सहकार्याने ५०० जणांना पुरेल एवढी खिचडी वाटप करण्यात आले. तसेच कलमाडी शाळा, बारणे शाळा, मरियम नगर, भीम नगर येथे खिचडी वाटप करण्यात आले.
स्व-रूपवर्धीनीचा सहभाग
संघस्वयंसेवकांसोबतच स्व-रूपवर्धीनीच्या १७ कार्यकर्त्यांनी मिळून नागझरी लगत मदतकार्य केले. तसेच ३०० जणांना अन्न आणि ब्लँकेट वाटण्याचे काम ताडीवाला रोड परिसरातील महात्मा फुले शाळेत करण्यात आले.
येरवडा भागात पूरग्रस्तांचे सर्वेक्षण
येरवडा भागातील शांतीनगरमध्ये पूरग्रस्त बाधित वस्त्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाचे समन्वयक आणि येरवडा भागातील स्वयंसेवक अशा चार संयुक्त टीम बनविण्यात आल्या होत्या. सर्वेक्षण करुन प्रत्यक्ष बाधित कुटुंबियांना टोकन देऊन त्याची नोंद करण्यात आली. यावेळी ६५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
६०२ पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना स्वच्छ्ता किटचे वितरण साधू वासवानी मिशनमार्फत नानासाहेब परूळेकर प्राथमिक विद्यालयात करण्यात आले. सर्वेक्षणात सुराज्यचे १४ समन्वयक आणि रा. स्व. संघाचे १८ स्वयंसेवकांनी भाग घेतला. नाना पालकर स्मृती चिकित्सालय व कोहकडे होस्पिटलतर्फे दोन ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. अमृतेश्वर महादेव मंदिरातर्फे ४०० पांघरूण व्यवस्था केली आहे. साईनाथ नगर मधील सारथी शाळेत ओषधे आणि साहित्याची व्यवस्था केली. खराडी नगरातील स्वयंसेवकांनी वाहतूक व्यवस्थापन केले. कात्रज भागातील अंतुलेनगर येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.