राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने फुलली पंढरी
पंढरपूर, 16 जुलै : आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांसह, गोवा, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरी नगरी फुलून गेली आहे. यंदा आषाढी नवमीच्या दिवशी सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी तर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग यंदा प्रथमच १२ नंबरची पत्रा शेड भरून गोपाळपूर पूलापर्यंत गेली असून ‘श्री’च्या दर्शनासाठी १८ ते २० तासांचा अवधी लागत आहे.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी व देहू येथून पायी चालत निघालेल्या दिंड्या व सर्व मानाच्या संतांच्या पालख्यांचे सोमवारी वाखरी येथील पालखीतळावर आगमन झाले होते. याशिवाय राज्यातील अन्य भागातून रेल्वे, एसटी व आपल्या खासगी वाहनातून दाखल झालेल्या लाखो भाविकांमुळे पंढरी नगरी गजबजून केली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, भक्ती सागर (६५ एकर), प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, पत्राशेड दर्शनरांग आदी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा नवमीलाच सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून पंढरीतील सर्व मठ, लॉज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत व नवीन भक्तनिवास हाउसफुल्ल झाले आहे.