पुणे, दि. १० जुलै : बारामती तालुक्यातील सुपे येथील ऐतिहासिक राखुंडी विहीर आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पायऱ्या असलेल्या विशिष्ट विहिरींची श्रमदानाने स्वच्छता केल्याने स्वच्छ पाण्याने विहिरी आणि परिसर खुलला आहे. पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला आहे.
सेवावर्धीनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत विहिरी स्वच्छतेचा उपक्रम राबवला जात आहे. बारामती तालुक्यातील सुपे येथील विहिरींबरोबरच पुरंदर तालुक्यातील जेजुरी मधील कडेपठार बारव, बंगाळी बारव, जनाई बारवांची स्वच्छता केली आहे. तसेच शिरूर तालुक्यातील धामारीतील वाघेश्वर व करंजावणे येथील बारवेची स्वच्छता केल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक गिरिजा शिरसीकर यांनी दिली.
सुप्यातील राखुंडी ऐतिहासिक बारव स्वच्छ केल्यानंतर सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच अश्विनी सकट यांच्या हस्ते बारवेतील पाण्याचे पूजन करण्यात आले. बारवेलगतचा परिसर स्वच्छ करून त्याजागी फुलझाडे लावण्यात येणार आहेत. याप्रसंगी सदस्य विलास वाघचौरे, विशाल चांदगुडे आदि उपस्थित होते.
सुप्यातील राखुंडी विहीर ही नंदा या प्रकारात मोडत असल्याची माहिती विहिरींचे अभ्यासक व जलसंपदा विभागातील निवृत्त कार्यकारी अभियंता प्रमोद काळे यांनी दिली. ते म्हणाले, एका बाजूने पायऱ्या असलेली बारव म्हणजे नंदा, दोन बाजूने पायऱ्या असलेली भद्रा, तीन बाजूंनी पायऱ्या असलेली जया तर चारही बाजूंनी पायऱ्या असलेल्या बारवेला विजया असे म्हणतात. सुप्यातील राखुंडी ही विहीर नंदा या प्रकारातील आहे.