आरोग्य क्षेत्रातील अनुकरणीय कार्य !

नाना पालकर स्मृती चिकित्सालयामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने सेवा कार्य केले जाते. त्याबरोबरच नागरिकांचे प्रबोधन आगळ्या-वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून करणे हे संस्थेच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

 – शैलेंद्र बोरकर


(नाना पालकर स्मृती चिकित्सालयामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्यात येते.)

नागरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी संस्थेकडून केले जाणारे उपक्रम ही प्रयोगशीलतेची उदाहरणे ठरावीत असेच आहे. समितीचे हे चिकित्सालय हे पुण्यात येरवडा शास्त्री नगर येथील स्वातंत्र्यसेनानी गंगाराम कर्णे हॉस्पिटल येथे चालते. हे आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र आहे आणि त्याबरोबरच येरवडा भागात पन्नासहून अधिक सेवावस्त्यांमधील नागरिकांसाठी आरोग्याशी संबंधित अनेक सेवा संस्था देते. चिकित्सालयात मुख्यतः होमिओपॅथी, आयुर्वेद आणि अँलोपॅथीचे बाह्यरुग्ण विभाग चालवले जातात. या अंतर्गत निशुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जातात. तसेच चिकित्सालयात समुपदेशनही केले जाते. तेथे प्रामुख्याने नागरिकांना आरोग्यासंबंधीची माहिती देण्याचे काम होते. नेत्रचिकित्सा उपक्रमात घरेलू कामगार महिला आणि त्यांच्या घरातील आजी आजोबा यांच्या डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णतः निःशुल्क स्वरूपात केली जाते. डोळ्यांच्या विविध आजारांवर दैनंदिन तपासणी केंद्रातून लगेच उपचार केले जातात. गेल्या तीन वर्षात एक हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया संस्थेने संपूर्णतः निःशुल्क केल्या आहेत.

घरकाम करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या सोयीच्या वेळी विनामूल्य बाह्यरुग्ण विभाग चालवला जातो. आणि त्याचा मोठा लाभ महिलांना होतो. या महिला ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीत दुपारच्या वेळेत फिरत्या रुग्णालयाची गाडी जाते आणि महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. आतापर्यंत पन्नास हजार महिलांना या सेवेचा लाभ झाला आहे. कामगारांच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक घरात जाऊन दातांची निगा राखण्याबाबत प्रचार केला जातो. त्यामुळे चांगली जागृती होते.

हजारो नागरिकांवर या चिकित्सालयाच्या माध्यमातून प्राथमिक दंत उपचार विनामूल्य करण्यात आले आहेत. या उपक्रमात दाताच्या विविध तपासण्या केल्या जातात, त्याच्यावर औषधे दिली जातात आणि काळजी कशी घ्यायची याचेही उपाय सुचवले जातात. लहान मुलांना चॉकलेट खाण्यामुळे दाताच्या गंभीर दुखण्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य वेळेत मुलांची दंततपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार सुचवले जातात आणि मुलांना दातांची काळजी कशी घ्यायची याचेही शिक्षण दिले जाते. तसेच मोठ्या सोसायटींमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी देखील आरोग्य शिबिरे चालवली जातात.

‘औषधी माझ्या अंगणातील’ हा एक वेगळा उपक्रम संस्थेतर्फे सुरू करण्यात आला आहे. आणि त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळत आहे. आपल्या घरात रोजच्या वापरात असलेल्या पदार्थाचा आपल्या निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेदिक उपयोग कसा आहे, याची माहिती नागरिकांना देण्याचा आणि त्यांना त्यासाठी कृतिशील करण्याचा हा उपक्रम आहे. आपल्या घरातील जिरे, ओवा, मीठ, लसूण, आलं यांचा वापर करून आपला आजार बरा करा आणि शंभर टक्के निरोगी रहा अशा प्रकारचे प्रबोधन आणि सोप्या पद्धती सांगून लोकांना हे करायला लावण्याचे काम संस्थेचे कार्यकर्ते दर आठवड्याला घरोघरी जाऊन अगदी आनंदाने करतात. ही माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी समाजमाध्यमाचाही उपयोग केला जातो.

आरोग्य शिबिर दत्तक योजना ही एक अशीच वेगळी योजना आहे. वस्त्यांमधील गरजू बांधवांची सेवा करताना समाजातील अनेक दानशूर मंडळींचा हातभार या कामाला या योजनेच्या माध्यमातून लागतो. त्याच प्रमाणे देसाई ब्रदर्स लिमिटेड हे संस्थेसाठी आर्थिक आधारस्तंभ आहेत. संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळतो, असा अनुभव संस्थेचे कार्यवाह श्री. जीवन कुलकर्णी सांगतात. ‘सर्वे सन्तु निरामयाः’ या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे अशीच रुग्ण सेवा संस्थे कडून व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 – शैलेंद्र बोरकर

(लेखक “सेवा भारती” या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *