एम्स ऋषिकेशमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्राम सदनाचे उद्घाटन
ऋषिकेश (उत्तराखंड), दि. ३ जुलै : राष्ट्रहितासाठी सेवा कार्य करणे आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाजवळील माधव सेवा विश्राम सदनच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. ज्यांना भारताचा विकास बघायचा नाही, तेच लोक देश आणि समाजात फूट पाडण्यात मग्न आहेत. तर भारतात राहणारे सर्व लोक एक आत्मा, एक शरीर आहेत. आपण सर्व मनाने एक आहोत. जेव्हा राष्ट्रीय सीमेवर हल्ला होतो, तेव्हा ते कोठून आहेत, हे कोणीही कोणाला विचारत नाही, प्रत्येकजण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी एका मनाने आणि एका भावनेने एकरूप राहतो असे विचार भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.
भागवत पुढे म्हणाले की, देशात असे अनेक महापुरुष आहेत, ज्यांचा प्रत्येकजण आदर करतो. छत्रपती शिवाजी आणि स्वामी विवेकानंद ही अशी उदाहरणे आहेत ज्यांना प्रत्येकजण आपला आदर्श मानतो. आपल्या सर्वांमध्ये हिंदुत्व आहे, फक्त ते ओळखण्याची गरज आहे. ही भावना संस्कृती, विधी, वेशभूषा किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असू शकते. या भावनेने एकत्र आलो तर राष्ट्राची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. आज जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, कोणत्याही देशाने भारतावर वाईट नजर ठेवली तर घरात घुसून मारले जाते.
सेवा हा माणसाचा परम धर्म आहे. आज जनसेवेत जनसंपर्काला महत्त्वाचे स्थान आहे, पण जनसंपर्काचा अभाव असताना जनसेवेचे उद्दिष्ट कसे साध्य होणार आहे. हे घर सेवा आणि समर्पणाचे थेट उदाहरण आहे. उत्तराखंडच्या दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि मैदानी भागातील लोकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे हे नक्की. या कार्यातून समाजसेवेचा आदर्श आम्ही नक्कीच मांडत आहोत असे भागवत यांनी यावेळी सांगितले.
ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश गोयल यांनी माधव सेवा विश्राम सदन हे मानवसेवेचे माध्यम असल्याचे सांगून भाऊराव देवरस सेवा ट्रस्टमार्फत चालविण्यात येत असलेल्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. शुभ प्रसंगी स्वामी चिदानंद मुनी, कथाकार विजय कौशल महाराज, महेंद्र रुपेंद्र प्रकाश महाराज, स्वामी रविदेव शास्त्री, महंत दुर्गादास इत्यादी संत, संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मंचाचे संचालन ट्रस्टचे सचिव राहुल सिंग व स्वाती यांनी केले. आभार ट्रस्टचे प्रकल्प प्रमुख संजय कृपाल यांनी मानले.
माधव सेवा विश्राम सदन :
भाऊराव देवरस सेवा ट्रस्टने ऋषिकेश एम्सजवळ वीरभद्र मार्गावर चार मजली माधव सेवा विश्राम सदन नव्याने बांधले आहे. विश्रामगृह दोन वर्षांत पूर्ण झाले. 1.40 लाख चौरस फूट जमिनीवर या प्रकल्पासाठी 30 कोटी रुपये खर्च आला. ज्यामध्ये सुमारे 150 रक्तदात्यांनी योगदान दिले आहे. येथे 120 खोल्या असून 430 खाटांची सोय करण्यात आली आहे. एम्समध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना एक फॉर्म भरून दिला जाईल. याच फॉर्मच्या आधारे परिचरांना राहण्याची सोय केली जाईल. येथे सेवकांना 10 रुपयांत अल्पोपहार आणि 30 रुपयांमध्ये भोजन मिळेल.