नवी दिल्ली, २७ जून : भारताचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक खालावली आहे. काल रात्री त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. वार्धक्यातून उत्पन्न झालेल्या आरोग्यसमस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नसून त्यांच्या आरोग्याविषयीचे मेडिकल बुलेटिन संबंधित डॉक्टर व वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच माध्यमांसमोर मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांना नियमित चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यी प्रकृती ठिक असल्याचेही सांगण्यात येत आहे.
भारताचे सलग तिसऱ्यांदा झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य भाजप नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच आडवाणी यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेतली होती. भाजपप्रणित रालोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी हे सर्व नेते आडवाणी यांना भेटून आले होते. त्यानंतर मात्र त्यांचे कोणतेही दर्शन समाजमाध्यमांमधून झाले नाही. आडवाणी यांच्या आरोग्यावर वैद्यकीय अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची येथे झाला. सध्या कराची पाकिस्तानात आहे. त्यांच्या लहानपणी तत्कालीन सिंध प्रांतात कराची येथे लागणाऱ्या संघाच्या शाखेत ते नियमितपणे जात असत. त्यांनी संघशाखेवर जबाबदारी घेऊन काम देखील केलेले आहे. देशाच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मात्र त्यानंतरही त्यांचा संघाशी असलेला संबंध अबाधित राहिला. जनसंघाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे राजकीय क्षेत्राचे काम आले. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी या जोडीने जनसंघ आणि नंतरच्या काळात भाजप देशात सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. राममंदिर आंदोलनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी गृहमंत्री व उपपंतप्रधान अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळल्या. अडवाणी यांना नुकताच देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करून भारत सरकारने सन्मानित केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.