पुणे, ता. २० : भारतीय विज्ञानाबद्दल जनजागृती घडवून आणणाऱ्या विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार व रविवारी (दि. २२ व २३ जून २०२४) पुण्यात लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी कॅम्पसमध्ये होणार आहे, अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी विज्ञान भारतीचे महासचिव प्रा. सुरेश भदोरिया, राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद रानडे उपस्थित होते.
डॉ. शेखर मांडे म्हणाले, “या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २२) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ, प्रख्यात विचारवंत सुरेशजी सोनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आदी मान्यवर अधिवेशनातील विविध सत्रांत सहभागी होणार आहेत. तसेच प्रख्यात शास्त्रज्ञ व विज्ञान भारतीचे मार्गदर्शक डॉ, विजय भटकर, सीएसआयआरचे माजी महासंचालक आणि विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि विज्ञान तंत्रज्ञान सचीव डॉ. अभय करंदीकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.”
डॉ. अरविंद रानडे म्हणाले, देशभरातील विज्ञान भारतीचे जवळपास १५०० पदाधिकारी या अधिवेशनास पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. यासह पुण्यातील २०० हुन अधिक सदस्य, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिकांची उपस्थिती असणार आहे.
हरित ऊर्जा, हायड्रोजन इंधन, इलेक्ट्रीक वाहने आणि ऊर्जा सुरक्षा; नव्या शैक्षणिक धोरणातील विज्ञान, तंत्रज्ञान व इनोव्हेशन या विषयांच्या शिक्षणविषयक तरतुदी, तसेच हवामान बदल आणि पर्यावरण व पाणी यांकरिता जीवनशैली या विषयांवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी होतील, त्याशिवाय समग्र विकासासंदर्भातील भारतीय चिंतन, विज्ञान व अध्यात्म आदि विषयांवरील व्याख्यानेही अधिवेशनात होणार आहेत. रविवारी सायंकाळी चार वाजता अधिवेशनाच्या समारोप सत्राला सुरुवात होईल.
प्रा. सुरेश भदोरिया म्हणाले, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अधिवेशन हे एक महत्त्वाचे संमेलन आहे. गेल्या ३३ वर्षांमध्ये, विज्ञान भारतीने आपल्या मुख्य उद्दिष्टांसाठी कटिबद्ध, एकत्रित प्रयत्नांचे प्रदर्शन केले असून, त्याचा आढावा घेणारी एक स्मरणिका प्रकाशित होणार आहे. यामध्ये विज्ञान भारतीचा स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास सूक्ष्मपणे मांडलेला आहे. तसेच, वैज्ञानिक दृष्टिकोनातून २०४७ च्या भारताची कल्पना करणाऱ्या शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या लेखांद्वारे विचार जागृत केले जातील.