वल्लभाचार्य (१४७९-१५३१)
वल्लभाचार्याचा जन्म इ.स. १४७९ मध्ये आंध्रप्रदेशातील एका तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला. या घराण्यात सोमयागाची परंपरा होती. पाचव्या वर्षीच वल्लभांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. व ‘विष्णुचित्त’ नामक गुरूंकडे त्यांना पाठवलं गेलं. एकपाठी असल्याने तिथलं शिक्षण झपाट्याने पूर्ण करून ते काशीला गेले आणि अकराव्या वर्षी त्यांनी भरतखंडाच्या यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत ते संपूर्ण देशभर पायी फिरले. पहिली यात्रा त्यांनी दक्षिण भारतात केली. या यात्रेत विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेवरायाने त्यांचं स्वागत केलं व कनकाभिषेक करून मानाची ‘आचार्य’ ही पदवी बहाल केली. दुसऱ्या तीर्थयात्रेत भारतभर फिरत असताना अत्यंत निराशाजनक परिस्थिती त्यांना पाहायला मिळाली.
वल्लभ संप्रदायाची स्थापना करून त्याद्वारे त्यांनी नवा ‘अनुग्रहरूप भगवतधर्म’ सांगितला. यामुळे सर्व माणसांना भगवतभक्तीचे दरवाजे खुले आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं आणि त्याद्वारे भक्तिमार्गाचं पुनरुज्जीवन करून मोठं योगदान दिलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
लोकांचं पुरोहितांचं अनीतिमान वर्तन पाहून समाजात केवळ राजकीय व सांस्कृतिक भेद नसून धर्म व अध्यात्ममार्ग याविषयीही सुसंगती नाही हे त्यांच्या लक्षात आलं. ही सर्व परिस्थिती पाहून वल्लभाचार्य अस्वस्थ झाले आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ग्रंथरचना करणं तसंच भक्तिमार्गाचा प्रसार करणं ही त्यांनी आपली दोन प्रमुख कार्य ठरवली.
कार्य व कार्यपद्धती निश्चित झाल्यावर वल्लभाचार्यांनी गुजरात व राजस्थान ही राज्यं जिंकून तिथे पुष्टीमार्गाचा उपदेश केला. वल्लभ संप्रदाय निर्माण करून त्यांनी जो वेदान्त सांगितला त्यास ‘शुद्धाद्वैत’ असं संबोधलं जातं. वल्लभ संप्रदायाचं उपास्यदैवत होतं गोवर्धनधारी श्रीकृष्ण, अन्य कोणत्याही संप्रदायात न आढळणारं श्रीकृष्णाच्या सेवापद्धतीचं अत्यंत विस्तृत व व्यवस्थित असं विधान वल्लभ संप्रदायात आहे.
सामान्य जनांनी आपलासा केला. हा संप्रदाय वृंदावनच्या भूमीत रुजला. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात यांसारख्या राज्यांत जो कृष्णभक्तीचा प्रवाह आढळतो त्याचा स्रोत वल्लभांच्या पुष्टीमार्गात आहे असं म्हटलं जातं. शुद्धाद्वैत वेदान्त आणि पुष्टीमार्ग लोकांना भावला, जवळचा वाटला व त्याचा प्रसार झाला याला वल्लभाचार्यांनी ग्रंथनिर्मितीतून केलेले प्रयत्न विशेष कारणीभूत आहेत. वल्लभाचार्यांनी ८४ ग्रंथ रचल्याची समजूत आहे, पण आज त्यांच्या नावावर असणाऱ्या ग्रंथांची संख्या ३१ आहे. भागवताच्या प्रत्येक श्लोकातील रहस्य समजावून सांगण्यासाठी त्यांनी भाष्य लिहिलं. ब्रह्मसूत्रांवरील ‘अणुभाष्य’ ही लिहिलं. यमुनाष्टक, मधुराष्टक अशी वल्लभाचार्यांनी लिहिलेली अष्टकं देखील प्रसिद्ध आहेत. हे सारं लेखन त्यांनी संस्कृतातून केलं. त्याचप्रमाणे, ब्रजभाषेच्या विकासासाठीही वल्लभाचार्य व त्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी महत्त्वाचं कार्य केलं. त्या काळात ब्रजभाषेला साहित्य क्षेत्रात स्थान नव्हतं. हे जाणूनच या पितापुत्रांनी अनेकांना या भाषेत लिहिण्यासाठी प्रोत्साहित केलं.
ग्रंथरचना व भक्तीमार्गचा प्रसार अशा दोन्ही अंगांनी आयुष्यभर सातत्याने कार्य करणाऱ्या वल्लभाचार्यांची जीवनयात्रा इ. स. १५३१ मध्ये संपुष्टात आली.