गलवान चकमकीनंतरही चीनने दोनदा केला होता हल्ल्याचा प्रयत्न

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत व चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतरही तब्बल दोन वेळा चीनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जागरूक भारतीय सैन्याने तो प्रयत्न हाणून पाडला आणि आपल्या सीमेचे रक्षण केले. नुकताच झालेल्या एका सैन्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ही बाब समोर आली. अर्थात याबाबत सैन्य अथवा संरक्षण मंत्रालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

सैन्याच्या वेस्टर्न कमांडने नुकताच आयोजित केलेल्या एका समारंभात भारतीय लष्करातील जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात एलएसीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सैनिकांच्या आक्रमकतेचा भारतीय सैन्याने कसा प्रतिकार केला हे यावेळी सांगण्यात आले. चंडीमंदिर येथील लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या या १३ जानेवारीच्या समारंभाचा व्हिडिओ वेस्टर्न कमांडने युट्यूब चॅनवर शेअर केला होता. ज्यात शौर्य पुरस्कारांबद्दल तपशीलवार माहिती देण्यात होती. मात्र, सोमवार, १५ जानेवारी रोजी व्हिडिओ हटवणयात आला. यावेळी नमूद करण्यात आले होते की, या चकमकी सप्टेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान घडल्या होत्या.

चीनशी जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर, भारतीय लष्कराने ३,४८८ किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनचा मुकाबला करण्यासाठी सैन्य सज्जता ठेवली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत, भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. एलएसीच्या तवांग सेक्टरमध्येही चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना झोडपून-झोडपून सीमेपलिकडे पिटाळले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ९ डिसेंबर २०२२ रोजी संसदेत याबाबत माहिती दिली होती. दरम्यान १३ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या सैन्याच्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात उल्लेखित चीनी घुसखोरीच्या घटनांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून देखील कुठलेही वक्तव्य किंवा खुलासा करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *