मुख्यमंत्र्यांचे झ्युरिकमध्ये जोरदार स्वागत, दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्री दाखल

झुरीकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकताच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दाखल झाले आहेत. जागतिक आर्थिक परिषद २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आजपासून सुरु झाली आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्यांचे आगमन होताच तेथील भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भल्या पहाटे, कुडकूडणाऱ्या थंडीत, मराठमोळा वेष परिधान करून माझ्या स्वागतासाठी आलेल्या सर्व मराठी बांधव भगिनींचे आभार, तसेच परदेशातही आपल्या संस्कृतीशी असलेले घट्ट नाते जपून ठेवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक अशा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

दरम्यान अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असतानाच स्वित्झर्लंडमध्येही हा क्षण अत्यंत श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येणार आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आणि हिंदू स्वयंसेवक संघाच्या वतीने यानिमित्ताने खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राम जप लेखन, हनुमान चालीसा रामरक्षा पठण, सुंदरकांड पठण आणि २२ तारखेला मंदिरात राम ज्योती प्रज्वलित करणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यासाठी पोहोचताच स्थानिक मराठी बांधव भगिनींनी या सोहळ्याचे निमंत्रण देऊन २२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाल्यावर त्यांची ही सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी रुजू करावी अशी विनंती केली. या विनंतीचा स्वीकार करून त्यांनी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेचा शिंदे यांनी विनम्रपणे स्वीकार केला. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *