समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम आहेत; त्यांचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलिकडे आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर होते. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स अर्थात एनएसीआयएनचे उद्घाटन केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
“प्रभू राम हे समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक आहेत. महात्मा गांधीदेखील रामराज्याबद्दल बोलायचे. सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलीकडे आहे. रामललाच्या अभिषेकापूर्वी मी ११ दिवस उपवास करत आहे.” असे मोदी यावेळी म्हणाले.
Very special moments at Lepakshi. pic.twitter.com/UEx7nsFT2j
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2024
ते पुढे म्हणाले, “आपला बंधु भरत याच्या कामाचे कौतुक करताना भगवान राम म्हणाले होते की, मला विश्वास आहे तू वेळ न घालवता कामे पूर्ण करतोस आणि यामुळे खर्चही कमी होतो. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारदेखील अशाचप्रकारे आपल्या खर्चाकडे लक्ष देत आहे.” आम्ही जीएसटीच्या रुपाने देशाला एक नवीन आधुनिकता दिली. आम्ही 7 लाख रुपयांपर्यंत करात सूट दिली. यामुळे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा कर वाचला. आज देशातील करदात्याला आपल्या कराचा योग्य वापर झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे ते पुढे येऊन कर भरत आहे. जनतेकडून जे काही घेतले, ते जनतेला अर्पण केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.