वैष्णव परंपरेतील द्वैत वेदान्त मताचे प्रवर्तक : मध्वाचार्य

मध्वाचार्य (११९९-१२९४)

कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील उडुपीपासून आठ मैलांवर असणाऱ्या पाजक नावाच्या क्षेत्री अश्विन शुद्ध दशमीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या काळाबद्दल मतभेद आहेत. पण सर्वसामान्यपणे इ.स. ११९९ ते १२९४ असा त्यांचा काळ मानला जातो. आईवडिलांनी त्यांचं नाव वासुदेव असं ठेवलं होतं. त्याचं व्युत्पत्तिकौशल्य इतकं विलक्षण होतं की, या जोरावर अनेक श्लोकांचा व शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने मांडला. नंतर त्यांनी उडुपीस राहणाऱ्या अच्युतप्रेक्षमुनींना गुरू करण्याचं ठरवलं व ते संन्यासी बनले. अच्युतप्रेक्षमुनींनी त्याचं नाव ‘आनंदतीर्थ’ ठेवलं. परंतु कालांतराने त्याचं नाव ‘मध्वाचार्य’ असं रूढ झालं.

श्रीरामानुजाचार्य या थोर संत व उपदेशकानंतर खऱ्या अर्थाने वैष्णवांची परंपरा श्रीमध्वाचार्य यांनी चालवली. निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानंद आदी आचार्यांचाही त्यात सहभाग असला तरी रामानुजांच्या खालोखाल मध्वाचार्यांनाच स्थान आहे.

माध्वमताचे लोक हनुमान, भीम यांच्या पाठोपाठ मध्वांना वायुदेवाचा अवतार मानतात. मध्वाचार्य हे वैष्णव परंपरेतील द्वैत वेदान्त मताचे प्रवर्तक होते. जगाचं स्वरूप आपण जसं प्रत्यक्ष अनुभवतो तसंच आहे अशी भूमिका त्यांनी आयुष्यभर मांडली. त्यासाठी भारताच्या उत्तरेस व दक्षिणेस यात्रा केल्या, वादविवाद केले. द्वैतमताच्या प्रचारासाठी १८ मठ स्थापले. कर्नाटक, आंध्रप्रदेशावर माध्वमताचा प्रभाव तर आहेच, परंतु बंगालमधील चैतन्य संप्रदायाची मुळंही माध्वसंप्रदायात सापडतात.

गुरू अच्युतप्रेक्षमुनी आणि शिष्य मध्वाचार्य यांच्यात मतभिन्नता होती. अच्युतप्रेक्ष अद्वैती होते, तर मध्वाचार्य द्वैती होते. त्यामुळे दोघांमधे अनेकदा शास्त्रार्थ होई. बिनतोड कोटीक्रम, अमोघ वक्तृत्व, संशयनिराकरणाची हातोटी आणि वाणीचं माधुर्य इत्यादी गुणांमुळे त्यांची लोकांवर छाप पडे. त्यामुळे अच्युतप्रेक्षमुनींनी त्यांना आपल्या मठाचं उत्तराधिकारी बनवलं. शंकराचार्यप्रणित जीव-ब्रम्हैक्य-वाद आणि मायावाद यांचं खंडन करून ईश्वर, जीव व जगत् यांतील भेद सत्य आहे व जगही सत्य आहे या द्वैत सिद्धांताचा पाठपुरावा त्यांनी केला.

‘जगाचा प्रवाह मिथ्या नाही, तो सदैव सत्य आहे. विष्णू हे सर्वोच्च तत्त्व असून परमात्मा अनंत गुणांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे भेद हे स्वाभाविक आहेत.
१) ईश्वराचा जिवाशी
२) ईश्वराचा जडाशी
३) जिवाचा जडाशी
४) एका जिवाचा दुसऱ्या जिवाशी
५) एका जड पदार्थाचा दुसऱ्या जड पदार्थाशी असे त्याचे पाच प्रकार आहेत.
या भेदांचं ज्ञान मुक्तीला साधक होतं. जिवाचं सामर्थ्य भगवंताधीन आहे. जिवांमध्ये तारतम्य असतं. ते मोक्षदशेतही विद्यमान असतं. पिशाच्चादी अधम जिवांना मुक्ती मिळत नाही. मुक्ती म्हणजे वास्तवसुखाची अनुभूती. ती चार प्रकारची असते. मुक्तीचा सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे अमला भक्ती. स्वार्थाची भक्ती हा मुक्तीतला मोठा दोष आहे’ असं त्यांचं मत होतं.

मध्वाचार्यांनी आपली तात्त्विक भूमिका निश्चित केल्यानंतर दक्षिण आणि उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्या व त्या दौऱ्यात अनेक भिन्न मतांच्या विद्वान पंडितांशी वाद करून आपल्या मताची युक्तता व श्रेष्ठता पटवून त्यांना आपलं शिष्य बनवलं. गुरूंसह त्यांनी प्रथम दक्षिण भारताची यात्रा केली. ती संपवून उडुपीला परत आल्यावर त्यांनी द्वैत मताला अनुसरून गीतेवर भाष्य लिहिलं. नंतर उत्तर भारताची यात्रा केली. व्यासांच्या आज्ञेवरून प्रवासातच त्यांनी ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिलं.

मतप्रचारार्थ मध्वाचार्यांनी एकूण ३७ ग्रंथ रचले. त्यांत १० प्रकरणग्रंथ, २ वादग्रंथ व १५ सिद्धांतग्रंथांचा समावेश आहे. त्यातील ऋण भाष्य, उपनिषद्-भाष्यं, गीताभाष्य, ब्रह्मसूत्रभाष्य, महाभारत-तात्पर्यनिर्णय, भागवततात्पर्यनिर्णय, मायावाद खंडन इत्यादींचा समावेश होतो.

भारताच्या दक्षिणेस व उत्तरेस यात्रा करून आणि ग्रंथलेखन करून मध्वाचार्यांनी आपली भूमिका सतत मांडली व त्यातून माध्वसंप्रदायाची उभारणी केली. या माध्वसंप्रदायाच्या शिकवणुकीमुळे अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक चळवळी सुरू झाल्या. त्यामुळे परकीय विध्वंसक मतप्रवाहांना आळा बसला. तिच्या रूपाने सामर्थ्यशाली भक्तिसंप्रदायाची लाट उदयाला आली आणि तिचा प्रभाव उत्तरेत व दक्षिणेत दोन्हीकडे पसरला. बंगालमधील चैतन्यसंप्रदायाची मुळं माध्वसंप्रदायातच आढळतात. चैतन्यांचे गुरू माध्वसंप्रदायी होते. दक्षिणेत ठळकपणे दिसणारा हा संप्रदाय कर्नाटकात ‘दासकूट’ या नावाने ओळखला जातो. हरिदास संप्रदायातील पुरंदरदास, कनकदास, विजयदास, जगन्नाथदास इ.नी कानडीत भक्तियुक्त व तात्त्विक विचाराने भरलेली अनेक पदं रचली आणि नैतिक व आध्यात्मिक विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले. पारमार्थिक जीवनावर भर देणाऱ्या अनेक संतकवींच्या हातून कर्नाटकात व इतर ठिकाणीही वैष्णव मार्गाचा म्हणजे भक्तिमार्गाचा जो प्रचार झाला, त्याचं श्रेय माध्व संप्रदायाला दिलं पाहिजे.

मध्वाचार्य हे आचार्य परंपरेतील अत्यंत प्रभावी व तेजस्वी तत्त्वज्ञ आहेत. भक्तिमार्गाशी तात्त्विकदृष्ट्या सुसंगत असं ईश्वरकेंद्री तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. भक्तिमार्गाचा आधार द्वैतच असतो व त्याला सुसंगत होण्यासाठी भेदवादी दृष्टिकोनाचा अवलंब करणं आवश्यक असतं, हे त्यांनी पटवून दिलं. रामानुजांनी भेदांना गौणत्व दिलं. त्यांचा द्वैतवाद आजही कर्नाटक व आंध्र प्रदेशात लोकप्रिय आहे. मध्वाचार्य हे भक्तिमार्गाचे अग्रगण्य तत्त्वज्ञ व प्रवर्तक म्हणून मान्य झालेले आहेत. गेली ७-८ शतक त्यांचा प्रभाव टिकून आहे.

 

सौजन्य – श्री सेवा फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *