चक्रधर स्वामी
(११९४-१२७४)
महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणावा असा कालखंड आहे. या काळात महाराष्ट्रात नाथ, वारकरी, महानुभाव, लिंगायत इ. धार्मिक संप्रदायांचा उदय झाला. अनेक सिद्ध सत्पुरुष महाराष्ट्रात उदयास आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात फार मोलाची भर घातली. त्यामध्ये महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे.
चक्रधर स्वामींचा कार्यकाल तेराव्या शतकातला आहे. चक्रधर स्वामी निवेदित आणि म्हाईंभट लिखित ‘लीळाचरित्रा’त त्यांच्या विचार पुढे येतो. परमेश्वर, देवता, प्रपंच आणि जीव असे चार नित्य मानून त्यांनी द्वैतवादाचा पुरस्कार केला.
त्या काळी हिंदू धर्मात एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. त्या परमेश्वराची प्राप्ती त्याचं ज्ञान आणि भक्ती यांचे द्वाराच होते, असं सांगून सर्व कर्मकांडांचा त्यांनी निषेध केला. जीव आणि परमेश्वर यांच्यातील नातं स्वीकारून जिवाला परमेश्वर कधीच होता येणार नाही, हे त्यांनी सांगितलं.
लौकिक जीवन जगताना सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमभाव, अहिंसक वृत्ती यावर त्यांनी भर दिला. तसा हा निवृत्तिप्रधान पंथ असल्याने मोक्षप्राप्तीसाठी प्रपंचातील अनासक्तीचा, कठोर तपाचरणाचा त्यांनी पुरस्कार केला. एका परमेश्वराखेरीज मोक्ष देण्याचं सामर्थ्य इतर कोणत्याही देवतेमध्ये नाही, देवता या फक्त तात्कालिक फळं देणाऱ्या असून ती फळं नश्वर असतात, त्यामुळे देवतांच्या उपासना मुमुक्षु जिवांसाठी त्यांनी वर्ज्य मानल्या. अशा तन्हेने परमेश्वराच्या उपासनेने जीवनाचं सार्थक्य साधण्याचा मार्ग सांगत असताना त्यांनी वर्णभेद, जातिभेद, व्यवसायभेद, यांच्याकडे दुर्लक्षच केलं नसून प्रत्यक्ष आचरणातही ते पाळले नाहीत. प्रत्यक्ष आचरणात विटाळ, चांडाळ, स्पृश्यास्पृश्य यांचा त्यांनी निषेध केला. अशी भूमिका जनमनात पोहचवणाऱ्या पहिल्या सुधारकांमध्ये त्यांची गणना होते.
चक्रधरांचा जन्म गुजरातमध्ये ११९४ च्या सुमारास झाला. चक्रधरांचं मूळचं नाव हरिपाळदेव होतं. असं म्हणतात की त्यांना तरुणपणीच झुगाराचे व्यसन जडलं होतं. एकदा हरिपाळदेव झुगारात खूप पैसे हरले. ते देण्यासाठी त्यांनी पत्नीकडे तिचे दागिने मागितले. पण तिने ते देण्यास नकार दिला. मग हरिपाळांच्या वडिलांनी ते ऋण चुकतं केलं. परंतु या प्रसंगाने हरिपाळदेव अंतर्मुख झाले. त्यांचं संसारातील लक्ष उडालं आणि गोविंदप्रभू या सिद्ध पुरुषाचं शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून त्यांनी शक्ति स्वीकार केला. गोविंदप्रभूनी या वेळी त्यांचं चक्रधर असं नामांतर केलं. यानंतर चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरात बारा वर्षं तपश्चर्या केली. तपश्चर्येच्या काळानंतर चक्रधर मौन धारण करून उन्मनी अवस्थेत परिभ्रमण करू लागले. काटोल इथे आले असता त्यांची उधळीनाथ या नाथपंथी सिद्धयोग्याशी भेट झाली. त्यांच्यापासून त्यांना तारुण्य कायम टिकवणारी वयस्तंभिनी नावाची विद्या प्राप्त झाली असं मानलं जातं. असंच फिरत फिरत वरंगल भागात आले असता एका व्यापाऱ्याच्या हंसांबा नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. काही दिवस ते या नव्या संसारात राहिले. पण एका अवधूताच्या दर्शनाने त्यांच्या वैराग्याने उचल खाल्ली आणि हंसांबेला स्थिती म्हणजे समाधीची अवस्था देऊन ते पुन्हा घराबाहेर पडले. व्याघ्रादी हिंस्र प्राण्यांना वश करणं, मृत व्यक्तीला जिवंत करणं, समाधी अवस्था प्राप्त करून देणं, आपल्या शरीरातून तेज प्रकट करणं इ. प्रकारचे अनेक चमत्कार त्यांच्या हातून या काळात घडले असं म्हटलं जातं. पुढे श्री दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी संन्यास धारण केला.
या काळापासून (१२६६) पुढील सात-आठ वर्षे त्यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रात आपल्या पंथाचा प्रचार करण्यात घालवली. १२७० च्या सुमारास नागदेवाचार्य पंथात आले आणि त्यांचा उत्तराधिकारी निश्चित झाला. स्वामींच्या रूपामुळे, त्यांच्या प्राणिमात्रांवरील कारुण्यभावामुळे अनेक स्त्रीपुरुष त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. त्यातून त्यांची लोकप्रियता वाढू लागली. स्वामींच्याकडे जसजसे लोक आकर्षित होऊ लागले तसतसं काही लोकांचं महत्त्वही कमी होऊ लागलं. त्यामुळे त्या लोकांनी स्वामींच्या विरुद्ध कारस्थान रचायला सुरुवात केली. त्यांच्यावर दोन वेळा विषप्रयोग झाला. त्यांच्या मठावर शस्त्रधारी सैनिक पाठविण्यात आले. पण त्यातून ते वाचले.
स्वामींच्या जीवनातील विविध प्रसंगांचं, त्यांनी केलेल्या उपदेशाचं निर्वाणानंतर काही वर्षांच्या काळातच महेन्द्र पंडित ऊर्फ म्हाइंभट यांनी परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ सिद्ध केला. हा ग्रंथ जगातील सर्वश्रेष्ठ अशा ग्रंथांच्या मालिकेत जाऊन बसला आहे. चक्रधर स्वामींच्या संपूर्ण आयुष्यक्रमाच्या समकालीन व्यक्तींनी केलेल्या सत्यअशा निवेदनांवर आधारित अत्यंत प्रासादिक आणि हृदयस्पर्शी गोड भाषेत हा ग्रंथ लिहिला आहे.
चक्रधर स्वामींचं जीवनकार्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची उपदेशपद्धती, त्यांचं तत्त्वज्ञान इ. सर्व समजण्यासाठी हा ग्रंथ म्हणजे अतिशय विश्वसनीय असा प्रमाणग्रंथ आहे. स्वतः चक्रधर स्वामींनी काही लेखन केलेलं नसलं तरी त्यांचा उपदेश, त्यांनी सांगितलेले दृष्टान्त, याचं अतिशय काटेकोरपणे, दक्षतेने, तज्ज्ञांकडून पारखून घेतलेलं संकलन या ग्रंथात मोठ्या साक्षेपाने केलेलं आहे. याच ग्रंथाच्या आधाराने महानुभावांचे ‘सूत्रपाठ’, ‘दृष्टान्तपाठ’ इ. धर्मग्रंथ सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे ‘लीळाचरित्र’, ‘सूत्रपाठ’, ‘दृष्टान्तपाठ’ या ग्रंथांना महानुभाव पंथात वेदांसारखी मान्यता आहे.
चक्रधर स्वामींचं प्रयाण १२७४ साली झालं असं मानलं तर त्या घटनेला सातशेच्या वर वर्ष होऊन गेली आहेत. परंतु त्यांच्या अनुयायांचा महानुभाव पंथ आणि त्याचा विचार अजूनही महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. वर्णविषमता आणि विटाळ चांडाळ याचं स्तोम चक्रधरस्वामींनी नाकारलं होतं, तोच विचार आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात स्वीकारला गेला आहे. या विचारांचा आग्रह धरणाऱ्या पहिल्या महामानवांत त्यांचं स्थान निश्चितपणे आहे. त्याशिवाय स्वतः काळाच्या सतत पुढे राहून आचरणसुलभ अशा धर्माची शिकवण दिली हे त्यांचं वैशिष्ट्य मानता येईल.
सौजन्य – श्री सेवा फाऊंडेशन