मोक्षाचा खरा मार्ग ज्ञान व कर्म यांपेक्षा भक्तीचाच आहे असं सांगणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामानुजाचार्य

रामानुजाचार्य (१०१७-११३७)

रामानुजांचा जन्म इ. स. १०१७ मध्ये तामिळनाडूतील चिंगलपेठ जिल्ह्यातील श्रीपेरेंबुदूर इथे झाला.

जीव आणि जग हे दोन्ही सत्य मानणाऱ्या द्वैतवादाचा पुरस्कार करून रामानुजाचार्यांनी वैष्णव धर्माची ध्वजा सर्वदूर पसरवली. दक्षिणेमध्ये आपल्या सर्वसमावशेक भक्तिसंप्रदायाला आदराचं स्थान मिळवून दिलं. अमोघ वक्तृत्व, अफाट विद्वत्ता आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत विचारधारेचा प्रतिकूल स्थितीतही निष्ठेने प्रचार केला व त्यामुळे वैष्णव धर्मात नवं चैतन्य निर्माण झालं. त्यांचं हे कार्य आणि त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थेमुळे पुढच्या काळात वैष्णवांची ध्वजा देशभरात डौलाने फडकू लागली.

यादवप्रकाश या महान अद्वैती आचार्यांच्या अद्वैतवादातील अमूर्त कल्पना रामानुजांचं समाधान करू शकल्या नाहीत. त्यानंतर ज्ञानाची सांगड भक्तीशी घालून भक्तिमार्गाचा पाया रचणाऱ्या अलरूवार भक्तिपरंपरेचे आचार्य यामुनाचार्य हे एक अत्यंत विद्वान गुरू रामानुजांना लाभले. यामुनाचार्य यांनी देह ठेवल्यावर ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिणं, द्रविड वेदांचा म्हणजे अळवारांच्या वाङ्मयाचा प्रचार आणि विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार करणं या यामुनाचार्य यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प रामानुजांनी सोडला व पुढे तो तडीस नेला. आपले गुरू यामुनाचार्यांना दिलेलं वचन पाळून रामानुजांनी ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिलं. त्यासाठी ‘बोधायनवृत्ती’ या दुर्मिळ ग्रंथाची काश्मिरात असणारी एकमेव प्रत आणून त्यांनी ‘श्रीभाष्य’ हा ग्रंथ लिहिला. काश्मीरच्या सरस्वतीपीठाने श्रीभाष्याचा गौरव केला.

रामानुजांच्या या सुरुवातीच्या कालखंडातील एक प्रसंग त्यांच्या विचारांची दिशा दाखवून जातो. श्रीरंगमला मठाचा सारा कारभार हाती घेतल्यानंतर रामानुजांनी गोष्ठींपूर्ण नावाच्या गुरूंकडून दीक्षा घेतली. गोष्ठींपूर्णांनी त्यांना ‘ॐ नमो नारायणाय’ असा मंत्र दिला व तो कोणालाही न देण्याची आज्ञा केली. या मंत्राने मुक्ती मिळते हे कळल्यावर रामानुज मंदिराच्या शिखरावर जाऊन जोरजोरात तो मंत्र म्हणू लागले. शेकडो स्त्री-पुरुष तो ऐकायला तिथे जमले. ही गोष्ट समजल्यानंतर चिडलेल्या गोष्ठीपूर्णांनी रामानुजांना ‘गुरूची आज्ञा मोडल्याबद्दल तुला नरक मिळेल’ असा शाप दिली. त्यावर रामानुज शांतपणे उत्तरले, “जर एवढ्या लोकांना मुक्ती मिळणार असेल तर मी नरकवास सोसायला आनंदाने तयार आहे.” त्यावर गुरू प्रसन्न झाले व त्यांनी ‘आजपासून हा वाद रामानुजदर्शन म्हणून प्रसिद्ध होईल’ असा वर दिला.

रामानुजांच्या कार्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा भाग म्हणजे सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेलं काम, जातिभेद, कर्मकांडाचं स्तोम प्रचंड माजलं असताना सातव्या ते नवव्या शतकात दक्षिणेतील अळवारांनी भेदभाव कधीच झुगारून दिले होते. त्यांच्या प्रभावामुळे रामानुजांनी भक्तिमार्ग बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाना प्रयत्न केले. श्रीरंगम्च्या मठाची सूत्रं हाती आल्यानंतर त्यांनी प्रथम देवळांची व्यवस्था लावली, उपासनापद्धतीत कडक शिस्त लावली. सामान्य लोकांपर्यंत धर्म पोहोचण्यासाठी पुराणातील एकेका कथेवर गीत-नाट्यं करायला सुरुवात केली. वेळोवेळी देवळात निरनिराळे समारंभ, कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे केवळ नीरस चर्चेच्या चौकटीत अडकलेल्या धर्माला रोचकता आली. आपल्या मंदिरांमध्ये अस्पृश्यांना व शूद्रांना त्यांनी प्रवेश तर दिलाच, शिवाय ‘परित्यक्तांना जवळ करणं हेच खऱ्या वैष्णवाचं काम असून ती त्याची कसोटी आहे,’ असं त्यांनी आग्रहाने सांगितलं. रामानुजांचे हे पुरोगामी विचार त्या वेळच्या परंपरावादी व कर्मठ पुजाऱ्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी श्रीरंगम् आणि कांची इथल्या विष्णुमंदिरात शूद्र व अस्पृश्यांना प्रवेश देण्यात खूप अडचणी आणल्या. एका पुजाऱ्याने तर रामानुजांवर भिक्षान्नातून विषप्रयोग केला. म्हैसूर राज्यातील आपल्या सोळा वर्षांच्या वास्तव्यात रामानुजांनी अस्पृश्योद्धारासाठी खूप प्रयत्न केले. पण फक्त ‘मेळकोट’ इथल्या विष्णुमंदिरात त्यांना हरिजनांसाठी प्रवेश मुक्त करता आला.

योग्य दिशेने उत्साहपूर्वक पावलं टाकल्याने या कालखंडात वैष्णव धर्माने एक सामर्थ्यवान चळवळीचं रूप घेतलं होतं. पुढे शैव असलेल्या चोळ राजा कुलुत्तुंगने रामानुज व त्यांच्या अनुयायांचा अनन्वित छळ केल्याने त्यांनी श्रीरंगम् सोडून तोन्नूर इथल्या होयसाळ घराण्यातील विट्टीदेव राजाचा आश्रय घेतला. त्या राजाने वैष्णवधर्माचा स्वीकार केला.

सुधारणावादी दृष्टिकोन हा रामानुजांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवणारा गुण. तोन्नूर इथल्या मोतीलाल तलावाचं बांधकाम, जवळच्याच नदीवरचं धरण रामानुजांच्याच देखरेखीखाली झालं, अशी इतिहासात नोंद आहे.

रामानुजांच्या विचाराचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा त्यांनी केलेला सन्मान. स्त्री व तिची कृपा या गोष्टी मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असल्याने त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा मान दिला. त्यांच्या शिष्यपरिवारात ज्याप्रमाणे जातिभेद, धर्मभेद न मानता सर्वांचा समावेश होता, त्याप्रमाणे शिष्याही अनेक होत्या. वैष्णव धर्माची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी आपल्या ७४ शिष्यांची निवड केली व ठिकठिकाणी मठ स्थापून धर्मप्रचाराचं कार्य त्यांच्यावर सोपवलं. अशा प्रकारे, आपलं १२० वर्षांचं प्रदीर्घ, कार्यव्याप्त, भक्तीने ओथंबलेलं जीवन संपवून रामानुजाचार्य यांनी इ.स. ११३७ मध्ये आपला देह ठेवला.

वैष्णवधर्माची परंपरा भारतात फार प्राचीन असली तरी रामानुजांनी तिला नवचैतन्य दिलं. मोक्षाचा खरा मार्ग ज्ञान व कर्म यांपेक्षा भक्तीचाच आहे असं सांगणारा व विष्णूला परब्रह्म मानणारा रामानुजांचा विष्णु संप्रदाय सर्व थरांतील लोकांना स्पर्शन गेला. पुढे याच वैष्णव संप्रदायाची पताका सर्वदूर पसरली, त्यांची मुळं रामानुजांच्या विचारात आणि वं कार्यात दिसतात.

 

सौजन्य – श्री सेवा फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *