नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम

१०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन

मेहसाणा, दि. १ जानेवारी : एकाच वेळी १०८ ठिकाणी ४००० पेक्षा अधिक लोकांनी सूर्यनमस्कार करण्याचा अनोखा विश्वविक्रम आज गुजरातमध्ये करण्यात आला. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्यमंदिरासह राज्यात विविध ठिकाणी हे सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक केले गेले. या उपक्रमामुळे गुजरातचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यामध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री भूपेश पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगरीकर यांच्यासह अनेक मान्यवर मोढेरा येथील सूर्यमंदिर याठिकाणी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले आहे. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“गुजरातने 2024 चे स्वागत एका उल्लेखनीय उपक्रमाने केले, तो म्हणजे – सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित करणे! आपल्या सर्वांना माहीत आहेच की, 108 क्रमांकाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या स्थळांमध्ये मोढेरा सूर्य मंदीराचाही समावेश आहे. येथील कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. योग आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्या वचनबद्धतेचा हा खरा पुरावा आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की मौलिक फायदे असलेल्या सूर्यनमस्काराला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *