भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी या महोत्सवासाठी सर्व प्रकारची नोंदणी सुरू झाली आहे. प्रेक्षक, विद्यार्थी, पत्रकार, चित्रपट निर्माते अशा सर्वच प्रकारांतील लोकांनी ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करण्यासाठी इफ्फीच्या संकेतस्थळावर सुरुवात झाली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा आहे. इफ्फी-५४ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, बु्द्धिजीवी आणि जागतिक चित्रपट रसिकांपैकी एक होण्याचा बहुमान मिळणार आहे.
माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी १ जानेवारी २०२३ रोजी वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणे आवश्यक आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनाही (फ्रीलान्सर्स) नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रिया अगदी सहज असून https://my.iffigoa.org/extranet/media/ येथे ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
‘इफ्फी’ला यशस्वी करण्यासाठी, सिनेमाच्या कौतुकाची संस्कृती जोपासण्यात आणि चित्रपटनिर्मितीकलेविषयी खऱ्या अर्थाने प्रेम जोपासण्यात माहिती आणि संवाद महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या महोत्सवासाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्याच्या आमंत्रणाबरोबरच प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने इफ्फीच्या उत्सवात हातभार लावण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सिनेमाचा निखळ आनंद आणि या चित्रपटांनी विणलेल्या मनोरंजक कथा, त्यांच्या निर्मात्यांच्या आयुष्याची, स्वप्नांची, आकांक्षांची आणि संघर्षाची अनोखी झलक दाखवणारे हे प्रदर्शन ५४ व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. चित्रपटांचा उत्सव केवळ पडद्यापुरता मर्यादित न राहता त्यापलीकडेही इफ्फी आणि इतर महान चित्रपट महोत्सवांचे सार स्पष्ट करणारे मास्टरक्लासेस, पॅनेल डिस्कशन, सेमिनार आणि संभाषणांची मेजवानी मिळणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२३ रात्री बारा वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी):
१९५२ साली स्थापन झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. इफ्फीने स्थापनेपासूनच चित्रपट, मनोरंजक कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्तींचा गौरव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चित्रपटांबद्दल सखोल कौतुक आणि प्रेम वाढविणे, लोकांमध्ये समजूतदारपणा आणि सौहार्दाचे सेतू तयार करणे आणि त्यांना वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी), गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्फीचे आयोजन केले जाते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) सामान्यत: या महोत्सवाचे नेतृत्व करीत होते, परंतु राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) चित्रपट मीडिया युनिट्सचे विलीनीकरण झाल्यामुळे एनएफडीसीने महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.