गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला. श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक नेहमीप्रमाणेच दीर्घकाळ चालली. ‘आपल्याला विसर्जन मिरवणुकीतल्या आवडलेल्या गोष्टी कोणत्या? असा प्रश्न मी विचारला होता. त्यावरच्या बहुतेक सर्व प्रतिक्रिया ‘मिरवणूक संपली’ किंवा ‘बाहेरगावी जाता आलं’ याच पठडीतल्या होत्या. मिरवणुकीतील डीजेंचा दणदणाट दिव्यांचा भगभगाट यांवर सडकून टीका झाली आणि ती व्हायलाच हवी. अन्यथा समाज म्हणून आपण आपला प्रवाहीपणा हरवून बसू आणि डबक्यातल्या पाण्याप्रमाणे आपली अवस्था होईल. किंबहुना उपनिषद काळापासून (जो संहिता काळाच्या अगदी जवळचा मानतात) आपली आत्मचिकित्सा करण्याची आणि त्यानुसार जीवनशैलीत बदल घडवण्याची जी वृत्ती आहे त्यामुळेच आपण आजपर्यंत तग धरू शकलो आहोत. गणेशोत्सवाचही असंच आहे. याची चिकित्सा झालीच पाहिजे, त्याच्यावर टीकाही व्हायलाच हवी. पण हे करताना आतापर्यंतच्या प्रवासात आपण काय काय मिळवलं याचीही नोंद घ्यावी असं वाटतं.
सर्वप्रथम, आत्मकेंद्रित आणि कुटुंबकेंद्रित असणाऱ्या आपल्या समाजाला एकत्र आणणं ही एक अतिशय अवघड आणि मोठी गोष्ट लोकमान्यांनी गणेशोत्सवाद्वारे घडवली, तीही पुण्यातच. मरगळ आलेल्या, निरुत्साही समाजाला जोशपूर्ण ढोल ताशा वादन करण्याची प्रेरणा याच गणेशोत्सवामुळे मिळाली. लोकमान्यच्या निधनापूर्वीच मानाचे पहिले पाच गणपती आणि शेवटचे दोन गणपती यांची व्यवस्था लोकमान्यांनी लावून दिली आणि समाजाने ती स्वीकारली. तसेच शहरातील एकच केंद्रीय मिरवणूक, त्याचा आरंभबिंदू आणि विसर्जन स्थळ ही अत्यंत क्षुल्लक वाटत असलेली परंतु महत्त्वाची व्यवस्था त्याकाळीच लावून दिली गेली. ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन आणि रंजन या दोन्ही गोष्टी करणे हे उत्तम प्रकारे साध्य झालं आणि होतही आहे. विज्ञान जसं पुढे गेलं तसं मांडवांमध्ये आणि विसर्जन मिरवणुकीत विद्युत रोषणाई, त्यातच हलणारे दिवे, यांत्रिक देखावे अशा अनेक तांत्रिक सुधारणा गणेशोत्सवाने स्वीकारल्या. कालांतराने डिस्को, डीजे इत्यादि विकृती यामध्ये शिरल्या हे नाकारता येणार नाही. तसंच ढोल ताशांच्या तालावर अत्यंत बीभत्स नृत्य करणारे लोक हेही काही स्वागतार्ह चित्र नव्हे. यामध्ये अत्यंत सुनियोजित ढोल ताशा वादन, टिपऱ्यांचा खेळ, लेझीमचा खेळ, ध्वज इत्यादि प्रकार सुरुवातीला ज्ञानप्रबोधिनी, रमणबाग, गरवारे, स्वरूपवर्धिनी इत्यादि संस्थांच्या मार्फत विसर्जन मिरवणुकीत आणले गेले. कालांतराने अनेक ढोल ताशा मंडळं स्थापन झाली आणि त्यांनीही सुनियोजित आणि शिस्तबद्ध ढोल ताशा वादन सुरू केलं.
‘इंडियन स्टॅंडर्ड टाईम’ म्हणून अत्यंत अपमानास्पद उल्लेख आपल्या वेळ न पाळण्याविषयी होत असे. आता ह्या नवीन ढोल-ताशा मंडळांमध्ये तरुण वादकांना मिनिटभर जरी उशीर झाला तरी त्यादिवशी वाजवायला वाद्य मिळत नाही, अशीही कडक शिस्त असणारी काही मंडळे आहेत. यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये युवतींचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. तुमच्या-आमच्यासारख्या घरातील मुली, महिला ढोल-ताशा वादन आणि पारंपारिक खेळ घरंदाजपणे नटून देवासमोर सादर करू लागल्या. ह्याच प्रकाराचा गैरफायदा घेण्यासाठी काही वाईट प्रवृत्ती टपल्या असता प्रवेशासाठी ‘आधार’ची सक्ती इत्यादि उपाययोजना करून त्याही आपल्याच समाजाने हाणून पाडल्या. पूर्वी विसर्जन मिरवणुकीनंतर लक्ष्मी रस्त्यावर गुलालाचा खच पडत असे. मिरवणुकीच्या बाहेरून जाणाऱ्या-येणाऱ्यांवरही गुलाल टाकण्याचे बीभत्स प्रकार काही अतिशय प्रसिद्ध मंडळांच्या मिरवणुकीतही होत असत. आपण पुणेकरांनी एक जागरूक समाज म्हणून गुलालाचा वापर लक्षणीयरीत्या कमी केला आहे हे अभिनंदनीय आहे. पूर्वी पुण्यातील मिरवणुकीच्या सुरुवातीला सुमित्रा आणि नंतर अनारकली हत्तीण असे. काही प्रसिद्ध मंडळांच्या मिरवणुकीत घोडेस्वार, सांडणीस्वार, एखाद्या वेळेला हत्ती यांचाही प्रयोग होत असे. एकूणच मिरवणूक अत्यंत वैभवशाली असे.
कायद्याने प्राण्यांच्या वापरावर बंदी आणल्यानंतर आपण तीही व्यवस्था अतिशय सहजपणे स्वीकारली. गुलाल उधळणे, बीभत्स नाचणे यांच्या जागी सुनियोजित खेळ, मर्दानी खेळ यांचा प्रभावी वापर आपणच एक समाज म्हणून करू शकलो. लक्ष्मी रस्त्यावरून एकच मिरवणूक निघत असल्याने ती खूप जास्त वेळ लांबू लागली तेव्हा काही मंडळांनी आपापली मिरवणूक टिळक, कुमठेकर किंवा केळकर रस्त्याने काढण्यास सुरुवात केली. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा तसेच मार्केट यार्ड येथील गणेशोत्सव मंडळ यांनी टिळक रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढायला सुरुवात करून एक प्रागतिक विचारांचा पायंडा पाडला. कामायनीतील विद्यार्थी, समाजाच्या सर्व घटकांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा गणेश विसर्जन मिरवणुकीत अत्यंत जागरूकपणे अधिकाधिक सहभाग होईल यासाठी अनेक मंडळे आणि कार्यकर्ते कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. मध्यंतरी गर्दीचा लोंढा थांबवण्यासाठी देखावे पाहायला काही मंडळांनी रांगा लावायला सुरुवात केली. त्यासाठी तिकीट लावण्याचे काही प्रयत्नही काही वर्ष झाले, जे अनिष्ट वाटल्यामुळे आपल्याच समाजाने ते बंद केले.
गेली दोन वर्ष एक अतिशय स्तुत्य प्रयत्न बघायला मिळाला. लकडी पुलावरील मेट्रोचा पूल कमी उंचीवर असल्याने एक वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे मेट्रोचे काम काही काळ थांबलंही होतं. परंतु, पुन्हा एकदा प्रागतिक विचार करत भव्य आणि उंच रथ मेट्रोच्या पुलाजवळ आल्यानंतर यंत्रणा वापरून त्याची उंची तात्पुरती कमी करण्याचे नियोजनही काही मंडळांनी केले, हेही कौतुकास्पदच नव्हे का? अन्यथा विज्ञान आणि गणेशोत्सव यांचा संबंध नातूवाडा मंडळ सोडल्यास फारसा येत नसे.
आपण आपली चिकित्सा करत असताना ज्या काही चांगल्या गोष्टी आपण एक शहर म्हणून किंवा एक समाज म्हणून स्वीकारल्या आहेत, घडवल्या आहेत त्यांचा ऊहापोह करण्याचा हा छोटासा प्रयत्न. आव्हानं खूप आहेत, डीजेच्या भिंतींची ध्वनी फेकण्याची क्षमता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नवीन प्रकारचे दिवे डोळ्यांना अधिकाधिक त्रास देत आहेत. यात बदल झालेच पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ध्वनीची पातळी मोजण्याची यंत्रणा उभी करून ती मर्यादा ओलांडणाऱ्या डीजेंवर, तसेच मंडळांवर वेळेत कार्यवाही केली जाणं ही काळाची गरज आहे. ध्वनिशास्त्रातले काही तज्ज्ञ अशीही यंत्रणा उभारू शकतील की ध्वनिक्षेपकांपासून काही अंतरापर्यंतच आवाजाचा प्रभाव राहील, आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आवाज पसरणार नाही. (सवाई गंधर्वमध्ये अनेक ठिकाणी ध्वनिक्षेपक लावले जात असत. आता अगदी मोजक्या ठिकाणी लावून त्याचा परिणाम सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्न केलेले दिसतात.)
तंत्रज्ञान आज आहे, उद्या अजून प्रगत तंत्रज्ञान येईल. याचा जसा वाईट वापर काही लोक करू शकतील तसाच त्याचा चांगला वापर करणेही शक्य आहे. पण मुख्य म्हणजे आत्मचिकित्सा करून स्वतःत सुधारणा घडवून आणण्याचा आपल्या समाजाचा एक स्थायीभाव आहे, तो आपल्याला ह्या सर्व दोषांवर मात करत अधिकाधिक सुनियोजित, सुंदर, शिस्तबद्ध मिरवणूक काढण्याकडे नक्की घेऊन जाईल.
निखिल देव