५३ वा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना जाहीर

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२१या वर्षांसाठी हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती देताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.

प्यासा, कागज के फूल, चौदवी का चांद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी या मुख्य चित्रपटांसह आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमधील वहीदा रेहमान यांच्या भूमिकांसाठी समीक्षकांनी त्यांची प्रशंसा केली आहे, असे ठाकूर यांनी अधोरेखित केले. वहीदा रेहमान यांच्या ५ दशकांहून अधिक काळाच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत, त्यांनी भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत, रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील घरंदाज स्त्रीच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे असे ठाकूर यांनी त्यांच्या अभिनय सामर्थ्याबद्दल बोलताना सांगितले. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या, वहीदाजी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमाने व्यावसायिक उत्कृष्टतेची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण सादर केले आहे.

नुकतेच संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिग्गज अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाला आहे याकडे लक्ष वेधून, ”ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेने मंजूर केला असताना, चित्रपटांनंतर आपले आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाजाच्या हितासाठी समर्पित केलेल्या वहीदा रेहमान यांना या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या महिलांपैकी एक असलेल्या वहीदा रेहमान यांना मानवंदना आहे”, असे अनुराग ठाकूर यांनी नमूद केले. आशा पारेख, चिरंजीवी, परेश रावल, प्रसनजीत चॅटर्जी, शेखर कपूर यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीत समावेश होता.

इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांनी जे काही प्राप्त केले ते त्यांच्या काळातील फार कमी अभिनेत्री करू शकल्या. अभिनय सामर्थ्याच्या जोरावर वहीदा रेहमान यांनी अनेक पुरस्कार पटकावले. गाईड (१९६५) आणि नील कमल (१९६८) मधील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही (१९७१) सन्मानित करण्यात आले. आणि १९७२ मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन तर २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. वहिदा रेहमान यांनी पाच दशकांहून अधिक काळाच्या चित्रपट कारकिर्दीत ९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि समीक्षकांची प्रशंसाही त्यांना मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *