दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान यांना 2021 या वर्षांसाठीच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती देताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. प्यासा, कागज के फूल, चौदवी का चांद, साहेब बीवी और गुलाम,गाईड , खामोशी या मुख्य चित्रपटांसह आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमधील वहीदा रेहमान यांच्या भूमिकांसाठी समीक्षकांनी त्यांची प्रशंसा केली आहे, असे ठाकूर यांनी अधोरेखित केले .वहीदा रेहमान यांच्या 5 दशकांहून अधिक काळाच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत, त्यांनी भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत, रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील घरंदाज स्त्रीच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे , असे ठाकूर यांनी त्यांच्या अभिनय सामर्थ्याबद्दल बोलताना सांगितले.